रेशनवर गव्हाऐवजी मका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

जळगाव ः शहरातील अनेक रेशन दुकानदारांनी कार्डधारकांकडून आलेले आधार कार्ड लिंकिंगसाठी तहसील कार्यालयात पाठविले आहेत. मात्र, तहसील कार्यालयातून ते रेशन कार्डाशी जोडले न गेल्याने नागरिकांना धान्य न घेताच परतावे लागत आहे. काही ठिकाणी रेशन दुकानदार कार्डावरील गहू कमी करून मका घेण्याची सक्ती करताना दिसत आहेत. 

जळगाव ः शहरातील अनेक रेशन दुकानदारांनी कार्डधारकांकडून आलेले आधार कार्ड लिंकिंगसाठी तहसील कार्यालयात पाठविले आहेत. मात्र, तहसील कार्यालयातून ते रेशन कार्डाशी जोडले न गेल्याने नागरिकांना धान्य न घेताच परतावे लागत आहे. काही ठिकाणी रेशन दुकानदार कार्डावरील गहू कमी करून मका घेण्याची सक्ती करताना दिसत आहेत. 

आता रेशन कार्डाला आधार कार्ड लिंक केल्यावरच रेशनवरील धान्य कार्डधारकांना मिळते. यासाठी रेशन दुकानदारांनी रेशन कार्डधारकांकडून आधार कार्डाच्या झेरॉक्‍स जमा करून त्या तहसीलदार कार्यालयात पाठवल्या आहेत. त्याला एक महिन्याचा कालावधी उलटला, तरीही अद्याप आधार कार्ड रेशन कार्डाला लिंक न झाल्याने नागरिकांना रेशन दुकानदार धान्य देत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांना रेशनवरील धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. शहरातील शिवाजीनगर, इंद्रप्रस्थनगर, राजमालतीनगर, शाहूनगर, खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर, तांबापुरा, जुने जळगाव आदी परिसरातील नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तहसीलमध्ये तब्बल एक हजार कार्ड लिंकिंग अभावी पडून आहेत. 

मक्‍याची दुप्पट भावात विक्री 
एक रुपयांत एक किलो मका मिळतो. मात्र, रेशन दुकानदार दोन रुपये दराने मक्‍याची विक्री करतात. एका कुटुंबाला मिळणाऱ्या गव्हाच्या प्रमाणातही रेशन दुकानदारांनी कपात केली आहे. त्याऐवजी ते मका घेण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी कार्डधारकांच्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून कार्डधारकांच्या अडचणी सोडविण्याची मागणी होत आहे. 

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बायोमेट्रीक पद्धतीने धान्य वितरणास सांगितले आहे. अनेक दुकानदारांनी 
नागरिकांच्या आधार कार्डाच्या झेरॉक्‍स तहसील कार्यालयात पाठविल्या. मात्र, त्यांचे रेशन कार्डाशी लिंकिंग झालेले नाही. यामुळे नागरिकांना धान्य देता येत नाही. अनेक ठिकाणी चुकीच्या डाटा एन्ट्री झालेल्या आहे. यामुळे नागरिक व रेशन दुकानदारांमध्ये रोज भांडणे होत आहे. 
- जमनादास भाटिया, अध्यक्ष जळगाव जिल्हा रेशन दुकानदार संघटना

Web Title: marathi news jalgaon reshan