"नवजीवन'मधील प्रवासी महिलेची फलाटावरच प्रसूती 

live photo
live photo

जळगाव : नवजीवन एक्‍स्प्रेसने चेन्नईहून राजस्थानला जाणाऱ्या एका आठ महिन्याची गर्भवती महिलेची जळगाव रेल्वेस्थानकात फलाटावरच अवेळी प्रसूती झाली. आई व बाळाला रुग्णवाहिकेअभावी तातडीने रिक्षानेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नवजात बाळाला मृत घोषित केले. बाळंतीण शारदादेवी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 
शारदादेवी हंसराज प्रजापती (वय 30, रा. सेलोरा, राजस्थान) या पती हंसराज प्रजापती, तीन वर्षांची मुलगी खुशबू आणि दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह काका रामलाल प्रजापती यांच्यासोबत चेन्नईहून राजस्थानकडे नवजीवन एक्‍स्प्रेसने जात होते. नवजीवन एक्‍स्प्रेसने आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भुसावळ रेल्वेस्थानक सोडल्यावर शारदादेवी यांना प्रसूती कळा जाणवायला लागल्या. पती हंसराज प्रजापती यांनी लागलीच रेल्वे टीसीशी बोलून याबाबत माहिती दिली. रेल्वे टीसी यांनी लगेच जळगाव रेल्वेस्थानक कार्यालयाला याची माहिती कळविली. त्यानुसार नवजीवन एक्‍स्प्रेस जळगाव रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी तयारी करून ठेवली. सकाळी 9.40 वाजता नवजीवन एक्‍स्प्रेस जळगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर येताच रेल्वे पोलिसांनी तातडीने महिलेला रेल्वेतून खाली उतरविले. शारदादेवी यांची फलाटावरच प्रसूती झाल्याने पोलिसांनी रेल्वेच्या महिला सफाई कर्मचारी यांनी आपल्याजवळ असलेल्या कापडाने नवजात मुलीला गुंडाळले व तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रिक्षाने रवाना केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहित पाटील यांनी तपासणीअंती नवजात बाळाला मृत घोषित केले. 

रिक्षाने रुग्णालयात धाव 
भुसावळ रेल्वेस्थानक सोडल्यावर शारदादेवी यांना प्रसूतीकळा असह्य झाल्या होत्या. नवजीवन एक्‍स्प्रेसमधील टीसींनी वायरलेसद्वारे जळगाव स्थानकावर कळविल्यानंतर 
रेल्वे पोलिस कर्मचारी रवींद्र ठाकूर, शैलेंद्र पाटील, योगेश चौधरी, मनोज मेश्राम, योगेश अडकणे यांनी डब्याजवळ धाव घेत शारदादेवी यांना खाली उतरवले. मात्र, जागीच त्याची प्रसूती झाली. रुग्णवाहिकेसाठी फोन करूनही वाहन उपलब्ध न झाल्याने स्थानकावरील स्वच्छता कर्मचारी असलेल्या महिलांना बोलावून प्रसूती महिलेस अडोसा करून बाळाला कापडात गुंढाळत रिक्षाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. 

बाळाचा मृत्यू 
अवेळी प्रसूती झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. बाळंतीण शारदादेवी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हंसराज प्रजापती यांचे चेन्नई येथे मोबाईल असेसरीजचे दुकान आहे. पत्नी शारदादेवी गर्भवती असल्याने तिला प्रसूतीसाठी राजस्थान येथे घेऊन जात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com