शहरातील खड्डे सिमेंटने बुजविणार : आमदार भोळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव : शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि विदारक स्थितीवर "सकाळ'ने वृत्तमालिकेतून प्रकाशझोत टाकल्यानंतर आता लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. आमदार सुरेश भोळे यांनी त्याची दखल घेतली असून, शहरातील रस्त्यावरील खड्डे सिमेंटने भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी "सकाळ'ला दिली. 

जळगाव : शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि विदारक स्थितीवर "सकाळ'ने वृत्तमालिकेतून प्रकाशझोत टाकल्यानंतर आता लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. आमदार सुरेश भोळे यांनी त्याची दखल घेतली असून, शहरातील रस्त्यावरील खड्डे सिमेंटने भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी "सकाळ'ला दिली. 
शहरातील तसेच महामार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची मालिका "सकाळ'ने प्रसिद्ध केली आहे. याबाबत आमदार भोळे म्हणाले, की "सकाळ'ने वास्तव चित्र दाखविले आहे. खरच शहरातील रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. अपघातांत नागरिक जखमी तर झालेच आहेत; परंतु याच खड्ड्यांमुळे अनेक जण मानेचे आणि कंबरदुखीच्या आजाराने बेजार झाले आहेत. 

अधिकाऱ्यांची बैठक 
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. पावसाळ्यामुळे बांधकाम मटेरिअलने खड्डे बुजविले जातात; परंतु पुन्हा पावसामुळे त्याचा चिखल होतो आणि पुन्हा तेथे खड्डे होतात. त्यामुळे नवीन पद्धतीने खड्डे भरण्याचा विचार करण्यात आला. 

सिमेंटने खड्डे भरणार 
सिमेंटने खड्डे भरल्यास ते जास्त दिवस टिकतात, असे निदर्शनास आले असल्याचे सांगून आमदार भोळे म्हणाले, की शहरातील सामाजिक कार्यकर्ते भगवतीप्रसाद मुंदडा यांनी आपल्या घराजवळील खड्डे सिमेंटने भरले आहेत. त्यांनी याबाबत आपणास माहिती दिली असून, शहरातही त्याच पद्धतीने खड्डे भरण्याचा विचार करण्यात येत आहे. शुक्रवारी (31 ऑगस्ट) महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. त्यावेळी आदेश देण्यात येईल आणि तातडीने कामही सुरू करण्यात येईल. 
 
असा भरतो सिमेंटने खड्डा! 
सिमेंटने खड्डा भरण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते भगवतीप्रसाद मुंदडा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की डांबर आणि पाणी हे शत्रू आहेत. त्यामुळे डांबराने भरलेले खड्डे पावसाळ्यात उखडून जातात. त्यामुळे आपण जेथे राहतो (गायत्री मंदिराजवळ, विसनजीनगर) तेथे रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. कारागिरांनी प्रथम खड्डा साफ करून घेतला. त्यावर सिमेंटचे पाणी मारले. त्यानंतर त्यात खडी व सिमेंटचे मिश्रण टाकून तो खड्डा भरून घेतला. त्यावर आपण पुठ्ठा टाकला आणि दिवसभर त्यावर पाणी मारले. आता ते खड्डे पक्के भरले आहेत. तेही मजबूतपणे. आपण याच पद्धतीने गल्लीतील इतर खड्डेही भरणार आहोत. 

Web Title: marathi news jalgaon road ciment MLA bhole