तरसोद ते चिखली चौपदरीकरणाला मुहूर्त सापडेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील फागणे ते तरसोद या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाला वेगाने सुरवात झालेली असताना याच कामाबरोबर मंजूर व निविदा प्रक्रिया झालेल्या तरसोद ते चिखली या टप्प्यातील कामाला सुरवात होण्यास अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यान, हे काम देण्यात आलेल्या मक्तेदाराने अद्याप बॅंक गॅरंटीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे हे काम सुरू होऊ शकलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम पंधरा दिवसांत सुरू होईल, अशी ग्वाही दिलेली असताना ही मुदतही आता संपल्याने कामाची प्रतीक्षा कायम आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर ते अमरावती या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेलेच आहे. नवापूर ते फागणे हे काम युद्धपातळीवर सुरू झालेले असताना फागणे ते चिखली या टप्प्यातील कामाचे अडचणींमुळे आणखी दोन टप्पे करण्यात आले. त्यात फागणे ते तरसोद या ८७.३ किलोमीटरच्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. ९४० कोटींच्या या कामाचा मक्ता एमबीएल इन्फ्रास्ट्रक्‍चर या मक्तेदाराकडे असून, हे काम वेगाने सुरू आहे. जळगाव शहराजवळील पाळधीपासून पुढे फागणेपर्यंत विविध ठिकाणी सपाटीकरण करण्यात आले असून काही ठिकाणी पुलांचे कामही हाती घेण्यात आले आहे.

तरसोद ते चिखली काम रखडले
दरम्यान, एकीकडे हा टप्पा वेगाने सुरू असताना तरसोद ते चिखली या टप्प्यातील कामाला ग्रहण लागले आहे. निविदा मंजुरी व कार्यादेश देऊन सहा महिने उलटूनही काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे या कामातील दिरंगाईबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. तरसोद ते चिखली या ६२.७ किलोमीटरच्या टप्प्यातील कामासाठी विश्‍वराज इन्व्हायर्नमेंटल या मक्तेदाराची ९४८ कोटी २५ लाखांची निविदा मंजूर आहे. मात्र, कामासाठी आवश्‍यक बॅंक गॅरंटी संबंधित मक्तेदाराने न भरल्याने हे काम सुरू होऊ शकलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. अर्थात, आता यासाठी महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (न्हाई) अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांची मुदत संपली
जळगाव शहरातील समांतर रस्त्यांच्या कामासाठी गेल्या १० जानेवारीस अजिंठा चौकात महामार्ग रोको आंदोलन झाले. या आंदोलनस्थळी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समांतर रस्त्यांच्या कामासह तरसोद ते चिखली टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम पंधरा दिवसांत सुरू होईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी हे काम सुरू होण्यासाठी दिलेली मुदतही संपली आहे. त्यामुळे या कामासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीही पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे.

Web Title: marathi news jalgaon road development national highway