वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द : जिल्हाधिकारी निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

जळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता परिवहन व वाहतूक विभागाकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. आज झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करावा, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

जळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता परिवहन व वाहतूक विभागाकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. आज झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करावा, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 
सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत समित्या नेमण्याचे आदेश दिल्यानंतरही नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक अपघात होऊन त्यात अनेकांचे बळी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने वाहतूक नियमनाबाबत कठोर पावले उचलली असून, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत दर आठवड्याला बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली. बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा, धुळ्याचे हितेश अग्रवाल, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अभियंता सतीश शिसोदे, महापालिकेचे शहर अभियंता डी. एस. खडके, वाहतूक शाखेचे निरीक्षक पठाण, एस. टी.चे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा आदी उपस्थित होते. 

परवाना निलंबित करा 
गेल्या काही दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. दुचाकी अथवा चारचाकी अशा कोणत्याही वाहनाने नियम मोडल्यास वाहनचालकाचा परवाना रद्द करण्याचे प्रमाण वाढवा. वाहतूक नियमनाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारू नका, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या. 

वाहनांची कसून चौकशी 
वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिस व आरटीओ विभागातील पथकांनी प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करावी. दुचाकीवर हेल्मेट, कारमधून जाताना सीटबेल्ट अनिवार्य असून त्याचीही तपासणी करावी. तपासणी मोहीम तीव्र करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. 

"ब्लॅक स्पॉट'वर फलक लावा 
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अनेक ठिकाणी "ब्लॅक स्पॉट' आहेत, गेल्या वेळच्या बैठकीत (3 डिसेंबर) अशा "ब्लॅक स्पॉट'वर त्यासंबंधी फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. अशा सर्व ठिकाणी तातडीने फलक लावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

जळगावातील "एन्ट्री पॉइंट' कमी करा 
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत "एन्ट्री पॉइंट' म्हणजे महामार्गास मिळणारे अनधिकृत रस्ते आहेत. हे सर्व "एन्ट्री पॉइंट' कमी करण्यावर भर द्यावा. महामार्गावरील ठराविक क्रॉसिंग चौक व प्रमुख ठिकाणीच "एन्ट्री पॉइंट' द्यावेत, असेही बैठकीत सांगण्यात आले. 

चौपदरीकरण, रुंदीकरणाचा आढावा 
राष्ट्रीय महामार्ग फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली, तसेच औरंगाबाद-जळगाव, जळगाव-पाचोरा-नांदगाव या रस्त्यांच्या चौपदरीकरणासह रुंदीकरणाच्या कामाचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
 

Web Title: marathi news jalgaon road sefty rule