आरपीएफ', रेल्वे पोलिस- चोरट्यांचे अर्थपूर्ण संबंध! 

residentional photo
residentional photo

ळगाव ः रेल्वे प्रवास करताना मोबाईल, दागिने, पर्स चोरी, बॅग चोरी, चैन ओढणे, पाकीट लांबविण्याच्या घटना वारंवार घडतात. विशेषतः म्हणजे रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांची नियुक्ती केलेली असते. असे असताना प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीस जातात यामागे ही सुरक्षा यंत्रणा व चोरट्यांचे लागेबांधे असल्याचे उघडपणे बोलले जाते. एवढेच नव्हे तर रेल्वे पोलिस, आरपीएफ व चोरटे यांच्यात अर्थपूर्ण संबंधामुळे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, असेही बोलले जात आहे. 

रेल्वेच्या विशेषतः आरक्षित, एसी डब्यात लग्नसराईच्या सिझनमध्ये हमखास चोऱ्या होतात. या चोऱ्या मोबाईल, चेन ओढून पळून जाणाऱ्या नसतात तर मौल्यवान दागिन्यांच्या असतात. 

रेल्वेत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय 
भुसावळला मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक अशा देशाच्या चारही कोपऱ्यातून रेल्वे येतात. आरक्षित डब्यात चोरी करणाऱ्या इराणी गॅंग, चढ्ढ्या गॅंग, सलीम गॅंग सारख्या टोळ्या आहेत. या टोळ्या चुटूक मुटूक चोरी करण्यापेक्षा एकदाच मोठी चोरी करतात. यात विशेषतः दागिने, रोकडे, मोबाईलचा समावेश असतो. या गॅंगने चोरी केल्यानंतर तीन ते चार महिने पुन्हा चोरी करीत नाहीत. कारण तीन महिन्यांसाठी लागणारा पैसा त्यांना एकाच चोरीत मिळतो. 

चोरीची विशिष्ट पद्धत 
या चोरीसाठी गॅंगमधील अनेक जण विविध स्टेशनवरून प्रवाशांच्या बॅगेत दागिने, रोकड आहेत का ? यावर नजर ठेवतात. एकदा दागिने असल्याची खात्री पटली की चोरी कोणत्या रेल्वे स्थानकावर करायची, कशी करायची? दागिने कोणी बाहेर आणायचे. ते कोणी कोठे न्यायचे, पकडले तर काय करायचे? आदी बाबतचे मोठे प्लॅनिंग अगोदरच तयार असते. मोबाईलद्वारे गॅंगमधील चोरटे एकमेकांच्या संपर्कात असतात. चोरलेला माल वेगळ्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसून चोरटे बाजारपेठेत आणतात. यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेता येत नाही. ठरावीक बाजारपेठेत माल विकून प्रत्येकाचा हिस्सा देवून मोकळे होतात. 

पर्स, दागिने लांबविणाऱ्या टोळ्या 
रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात, रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत, पर्स लांबविणाऱ्या महिलांच्या टोळ्या आहेत. सर्वसाधारण कपडे घालून टोळीतील महिला प्रवासी महिलांमध्ये जाऊन त्यांना काही प्रश्‍न विचारून गर्दीचा फायदा घेत त्यांची पर्स, गळ्यातील पोत लंपास करतात. गॅंगमधील एका महिलेने पोत, पर्स लांबविली ती लागलीच तिच्या गॅंगमधील दुसरीला, ती तिसरीला देत लंपास केली जाते. जेव्हा पोत तोडल्याचा, पर्स लांबविल्याचा प्रकार लक्षात येतो तोपर्यंत चोरणाऱ्या महिला पसार झालेल्या असतात. 

सुरक्षा यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत 
प्रवासी रेल्वेत असले की त्यांची विविध प्रकारे लूट सुरू होते. खाद्यपदार्थ विक्रीपासून चोरी-चपाटीपर्यंत अनेक प्रकार घडतात. वर्दीवाले आरपीएफ, रेल्वेपोलिस समोर असतातही मात्र, ते प्रवाशांची मदत करतीलच, याची शाश्‍वती देता येत नाही. उलटपक्षी आरपीएफ तर चोरट्यांना कोणत्या प्रवाशाकडे माल आहे, याची माहिती पुरविण्याचे काम करीत असल्याचे प्रकार सर्रास घडतात. त्यांच्याविरोधात बोलायला गेले तर प्रवाशांनाच धमक्‍या मिळतात. 

गाडी "स्लो' होताना मोबाईल चोरी 
अनेक प्रवासी रेल्वेत जागा नसल्याने रेल्वेच्या पायरीवर बसतात. काहीजण मोबाईल काढून पाहतात. जेव्हा एखादे रेल्वे स्थानक येते तेव्हा गाडी स्लो होते. नेमक्‍या याच संधीचा फायदा घेऊन चोरी करणारे हातात काडी घेऊन रेल्वेच्या बाजूने उभे असतात. त्यांच्याजवळ गाडी आली की काही समजण्याच्या आत काडी मोबाईलधारकाच्या हातावर मारतात. मोबाईल खाली पडतो. तो ओरडतो मात्र गाडी फलाटाकडे जात असते. उडी मारली तर जीव गमाविण्याचा धोका असतो. येथे आरपीएफ, रेल्वे पोलिस नसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com