वेळोवेळी दरवाढ होऊनही "एसटी'ची सेवा खिळखिळीच! 

राजेश सोनवणे
शुक्रवार, 8 जून 2018

जळगाव ः गावांना शहरांशी आणि शहराला गावांशी जोडणाऱ्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाने शहरांसह ग्रामीण व दुर्गम भागात सेवा पोचविली असली, तरी ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत "एसटी'ची सेवा अजूनही खिळखिळीच आहे. बहुतांश ठिकाणी बस वेळेवर पोचत नाही, तर अनेक गावांमध्ये "एसटी'च अद्याप पोचलेली नाही. एकीकडे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि अन्य खर्चाचा मेळ घालण्यासाठी तिकीटदरात अठरा टक्के वाढ केली जात असताना, "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद सार्थ करण्याचा प्रयत्न मात्र "एसटी'कडून होताना दिसत नाही.

जळगाव ः गावांना शहरांशी आणि शहराला गावांशी जोडणाऱ्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाने शहरांसह ग्रामीण व दुर्गम भागात सेवा पोचविली असली, तरी ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत "एसटी'ची सेवा अजूनही खिळखिळीच आहे. बहुतांश ठिकाणी बस वेळेवर पोचत नाही, तर अनेक गावांमध्ये "एसटी'च अद्याप पोचलेली नाही. एकीकडे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि अन्य खर्चाचा मेळ घालण्यासाठी तिकीटदरात अठरा टक्के वाढ केली जात असताना, "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद सार्थ करण्याचा प्रयत्न मात्र "एसटी'कडून होताना दिसत नाही. तिकीटदराच्या तुलनेत दर्जेदार सेवा देण्यासाठीची व्यावसायिकता महामंडळाच्या कारभारात येत नसल्याचेही यावरून सिद्ध होते. 
राज्य परिवहन महामंडळाने "गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे बस' हे ध्येय समोर ठेवून ग्रामीण भागात बससेवा देण्यास सुरवात केली. ग्रामीण भागातील प्रवाशांना सेवा पुरविणारी बससेवा राज्यभरात 1960 मध्ये सुरू झाली. "एसटी' आता साठीकडे वाटचाल करीत असली, तरी मोठी शहरे आणि मुख्य मार्गावरील गावे सोडली, तर ग्रामीण भागात बसच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या बस अगदी खिळखिळ्या आणि भंगार अवस्थेतील आहेत. खराब रस्ते, कमी प्रवासी संख्या; यासोबतच काही गावांत बस फिरविण्यासही जागा नसल्याची कारणे सांगितली जातात. दुसरीकडे बसफेऱ्यांच्या निश्‍चित वेळा पाळल्या जात नसल्याने ग्रामीण प्रवाशांनीही "एसटी'कडे पाठ फिरविल्याचे दिसते. परिणामी, ग्रामीण भागातील सेवा तोकडी पडत असल्याचा अनुभव येतो आहे. 

ग्रामीणमधून रोज साठ लाखांचे उत्पन्न 
महामंडळाच्या जळगाव विभागात एकूण साडेआठशे बस आहेत. या बसद्वारे लांब पल्ल्याच्या, शहरी आणि ग्रामीण फेऱ्या सोडण्यात येतात. विभागातील पंधरा आगारांमधून दिवसाला साडेपाच हजार बसफेऱ्या जात असून, यात ग्रामीणच्या साडेचार हजार बसफेऱ्या आहेत. या फेऱ्यांमधून विभागाला हंगामात 90 लाखांपर्यंत आणि इतर दिवसांत 50 ते 60 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. म्हणजेच महामंडळाच्या उत्पन्नातील अधिक वाटा हा ग्रामीण भागातील बसफेऱ्यांमधून मिळतो. 

अनेक गावांना बसची प्रतीक्षा 
बस धावणाऱ्या मुख्य मार्गावरील गावे सोडली, तर ग्रामीण भागातील बसफेऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात बस वेळेवर पोचत नाहीत, तर अनेक बस गावात न जाता गावाजवळच्या फाट्यापर्यंतच जातात. त्यामुळे प्रवाशांना पुढचा प्रवास एक तर खासगी वाहनाने किंवा पायपीट करीत पूर्ण करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांत हा त्रास अधिक जाणवतो. दुसरीकडे, जिल्ह्यात शंभरहून अधिक गावांमध्ये अद्याप बस पोचलेलीच नाही. यातील अनेक गावे मुख्य रस्त्यापासून दीड ते दोन किलोमीटरवर आहेत. पण, तिथपर्यंत सेवा देण्यात "एसटी' कमी पडली आहे. 
 
...म्हणूनच अवैध वाहतुकीला चालना 
"एसटी'च्या फेऱ्यांबाबत आजही वेळेचे बंधन पाळले जात नाही. दिवसभरातून सुटणाऱ्या बसच्या खूप कमी फेऱ्या वेळेवर पूर्ण होत असतील. बहुतांश बसफेऱ्या उशिराने सुटत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते किंवा बस पूर्ण भरेपर्यंत बसून राहावे लागते. बस वेळेवर निघत अन्‌ पोचत नसल्यानेच अवैध वाहतुकीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे.

Web Title: marathi news jalgaon rural bus seva