"सिझेरियन' सुविधेमुळे ग्रामीण रुग्णालये ठरताहेत वरदान!

राजेश सोनवणे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जळगाव ः खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करायचे म्हणजे खूप खर्च लागतो. शिवाय शासकीय रुग्णालय म्हणजे जिल्हा रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेवर वेळेवर उपचार झाले नाही, तर मृत्यू होण्याच्या घटना देखील घडतात. परंतु, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात "सिझेरियन' शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ते वरदान ठरताहेत. 

जळगाव ः खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करायचे म्हणजे खूप खर्च लागतो. शिवाय शासकीय रुग्णालय म्हणजे जिल्हा रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेवर वेळेवर उपचार झाले नाही, तर मृत्यू होण्याच्या घटना देखील घडतात. परंतु, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात "सिझेरियन' शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ते वरदान ठरताहेत. 

जिल्हा रुग्णालयांतर्गत येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठीची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नव्हती. शिवाय, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्‍तपदे ही देखील एक समस्या होती. परंतु, जानेवारीपासून रिक्‍त असलेल्या पदांची भरती होऊन प्रसूतीच्या सुविधेसोबतच "सिझेरियन' शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. मुळात ग्रामीण भागात गरोदर महिलेला तत्काळ रुग्णवाहिका न मिळाल्यास पोटात दुखण्याचा त्रास होतो. जिल्हा रुग्णालयात आणताना गाडीतच प्रसूती होणे किंवा अधिक रक्तस्राव होऊन गरोदर महिलेला प्रसूतिपूर्वच मृत्यू होत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशा घटनाही "सिझेरियन' शस्त्रक्रियेच्या सुविधेमुळे कमी झाल्या आहेत. 

जिल्हा रुग्णालयात प्रमाण निम्म्यावर 
उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठीच्या पुरेशा सुविधा नसल्याने गरोदर महिलांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जात होते. यामुळे जिल्हा रुग्णालयात प्रसूती आणि "सिझेरियन' शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण महिन्याला साधारण एक हजारावर होते. हे प्रमाण कमी होऊन निम्म्यावर आले आहे. जिल्हा रुग्णालयात एप्रिल ते जून दरम्यान 1 हजार 214 प्रसूती झाल्या आहेत. यात महिन्याला 135 तर एप्रिल ते जून दरम्यान 415 सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या आहे. यातील 169 सिझेरियन शस्त्रक्रिया या उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मिळून झाल्या आहेत. 

दोन तालुक्‍यात प्रतीक्षा 
जिल्हा रुग्णालयांतर्गत असलेल्या तीन उपजिल्हा रुग्णालय आणि सात ग्रामीण रुग्णालयांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा झाली असून, यावल आणि चाळीसगाव या दोन तालुक्‍यांत ही सुविधा होण्याची प्रतीक्षा आहे. यामुळे यावल आणि चाळीसगाव तालुक्‍यातील गरोदर महिलांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जात आहे. 

उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्याने माता मृत्यूचे प्रमाण गेल्या काही महिन्यात घटले आहे. यामुळेच जळगाव जिल्ह्यातील हे प्रमाण 30 टक्‍क्‍यांपर्यंत आले आहे. चाळीसगाव आणि यावल तालुक्‍यात देखील ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. 
-डॉ. नागुराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 

Web Title: marathi news jalgaon rural hospital cesarean