"सकाळ' वर्धापनदिनाचे औचित्य... बहिणाईची गीते अन्‌ कवितांची सुरेल मैफल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव : "सकाळ'चा 14 वा वर्धापनदिन, विद्यापीठाचा बहिणाबाई चौधरी नामविस्तार सोहळा आणि नवजीवन सुपरशॉपच्या त्रिदशकी वाटचाल, अशा तिहेरी सुवर्णयोगाचे औचित्य साधून शुक्रवारी (10 ऑगस्ट) "परिवर्तन'तर्फे सादर बहिणाबाईंच्या काव्याची "अरे संसार संसार' ही बहारदार मैफील आयोजित करण्यात आली आहे. 

जळगाव : "सकाळ'चा 14 वा वर्धापनदिन, विद्यापीठाचा बहिणाबाई चौधरी नामविस्तार सोहळा आणि नवजीवन सुपरशॉपच्या त्रिदशकी वाटचाल, अशा तिहेरी सुवर्णयोगाचे औचित्य साधून शुक्रवारी (10 ऑगस्ट) "परिवर्तन'तर्फे सादर बहिणाबाईंच्या काव्याची "अरे संसार संसार' ही बहारदार मैफील आयोजित करण्यात आली आहे. 
राज्य सरकारने नुकतेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा केली असून, त्यासंबंधी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. याच सुवर्णयोगाचे औचित्य साधत "सकाळ' व नवजीवन सुपरशॉपतर्फे शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी सहाला कांताई सभागृहात "अरे संसार संसार' ही बहिणाईची गीते अन्‌ कवितांची सुरेल मैफल रंगणार आहे. या बहारदार कार्यक्रमास "सकाळ'च्या 14 व्या वर्धापनदिनाचे व "नवजीवन'च्या 30 वर्षपूर्तीचेही निमित्त आहे. 
जळगावातील सांस्कृतिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या "परिवर्तन' संस्थेतर्फे हा कार्यक्रम सादर होणार असून, त्यात जीवनाचा सार सांगणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता, गीतांचा समावेश असेल. "परिवर्तन'मधील स्थानिक कलावंत सादर करत असलेली ही मैफील सर्वांसाठी खुली असून, शहरातील व जिल्ह्यातील काव्यप्रेमी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व शुक्रवारची सायंकाळ सुरेल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

जीवनाचे तत्त्वज्ञान अन्‌ बरंच काही..
बहिणाबाई, त्यांच्या कविता, गाणी सर्वांना परिचित आहेतच. मात्र, बहिणाईमधून कविता कशी प्रगटली, त्या कवितेचं जळगावशी असलेलं नातं, आपल्या परंपरा, कृषीजन संस्कृतीचा स्वर, जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारे बोल हे सादर करण्याचा प्रयत्न या मैफलीतून होणार आहे. बहिणाईच्या कविता, पारंपरिक गीतं, अनवट चाली हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल.

Web Title: marathi news jalgaon sakal vardhapan din bahinabai