सलून व्यवसायासाठी मिळणार उभारी! 

सलून व्यवसायासाठी मिळणार उभारी! 

जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या मंडळाच्या उपक्रमातून ग्रामीण व शहरी भागातील नाभिक समाजातील तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी मदत होणार आहे. 
महाराष्ट्र शासनाचा इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडून 13 सप्टेंबर 2019 अन्वये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नाभिक समाजासाठी इतर मागासवर्गीय वित्तीय व विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळ' स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मंडळाच्या अध्यक्षपदी सुधीर ऊर्फ बंडू राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळावरील नवीन कार्यकारिणीची निवड ही नवीन राज्यातील सरकार आल्यानंतर केली जाऊन पुढील नियोजन केले जाणार आहे. 

आधुनिक प्रशिक्षण मिळणार 
सलून व्यवसाय आता पारंपरिक पद्धतीने राहिलेला नसल्याने आधुनिक पद्धतीने या व्यवसायाला स्वरूप आले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुण मुंबई, पुणे, नाशिक येथे जाऊन आधुनिक प्रशिक्षण घेतात; परंतु आर्थिक सक्षम व ग्रामीण भागातील तरुणांना पैसे नसल्याने हे प्रशिक्षण घेता येत नाही. त्यामुळे आता स्थापन होणाऱ्या "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या माध्यमातून नामांकित तज्ज्ञांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

विविध भागांत प्रशिक्षण केंद्र 
राज्यातील नाभिक समाजातील तरुणांना सलून व्यवसायाचे प्रशिक्षण "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'तर्फे देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विविध विभागांत हे प्रशिक्षण केंद्र उभारले जाऊन त्या विभागातील नाभिक समाजातील तरुणांना आधुनिक प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून देण्याचे नियोजन मंडळाकडून केले जाणार आहे. 

व्यवसाय उभारणीसाठी होणार मदत 
नाभिक समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठीदेखील या "केशशिल्प मंडळा'कडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे नाभिक समाजातील तरुणांना याचा मोठा फायदा व्यवसाय उभारण्यासाठी होणार आहे. 

अन्य राज्यांत अभ्यासदौरा 
देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या राज्यांत "केशशिल्प मंडळा'च्या माध्यमातून नाभिक समाजासाठी चांगले काम सुरू आहे. त्याअंतर्गत या मंडळाची स्थापना झाली असून, राजस्थान राज्यातील मंडळाचे काम उत्कष्ट सुरू आहे. या राज्यातील मंडळाकडून योजना राबविल्या जातात. याचा अभ्यास करून महाराष्ट्रात योजना मंडळाकडून राबविल्या जाणार आहेत. 


नाभिक समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या तरुणांना व्यवसायासाठी या नव्याने स्थापन झालेल्या "केशशिल्प मंडळा'चा खूप मोठा फायदा होणार आहे. यासाठी मंडळाकडून विविध योजनांद्वारे राज्यातील नाभिक समाजाच्या सलून व्यवसाय करणाऱ्या तरुणांना याचा फायदा होणार आहे. 
- सुधीर ऊर्फ बंडू राऊत, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळ, नागपूर 

अनेक वर्षांपासून नाभिक समाजाचा लढा सुरू होता. याची शासनाने दखल घेऊन "केशशिल्प मंडळा'ची स्थापना केली. या मंडळामुळे नाभिक समाजातील तरुणांना विविध योजना, व्यवसायवृद्धीसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. 
- एकनाथ शिरसाठ, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com