"तनहाई सडकों पर आवारा.. मैं कैद कफसमें बेसहारा..!'; अमेरिकास्थित सराफ दाम्पत्याचा अनुभव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

अल्पना व अमोल हे दाम्पत्य महिनाभरापासून घरात बंदिस्त आहे. ही भयावह स्थिती उद्‌भवू द्यायची नसेल तर भारतीयांना आणखी काही आठवडे घरीच बसा, असा सल्लाही या दाम्पत्याने दिलांय.. 

जळगाव  : न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया ही शहरं जगाची आर्थिक सत्ताकेंद्र. पण, या सुंदर शहरांमध्ये सध्या कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरू आहे. हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढताहेत, शेकडोंच्या संख्येने मृत्यूचे तांडव सुरू आहे. रस्त्यावर सैन्य दलाशिवाय कुणी नाही.. "तनहाई सडकों पर आवारा.. मैं कैद कफसमें बेसहारा..' या शब्दात तेथील अनुभव शेअर केलांय मूळ जळगाव निवासी अमेरिकेतील टाम्पा स्थित चित्रकार अमोल सराफ यांनी. अल्पना व अमोल हे दाम्पत्य महिनाभरापासून घरात बंदिस्त आहे. ही भयावह स्थिती उद्‌भवू द्यायची नसेल तर भारतीयांना आणखी काही आठवडे घरीच बसा, असा सल्लाही या दाम्पत्याने दिलांय.. 
अल्पना व अमोल सराफ हे दाम्पत्य अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील टाम्पा शहरात गेल्या चार वर्षांपासून स्थायिक झालेत. अमोल हे प्रसिद्ध चित्रकार आहेत. टाम्पा शहर न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियापासून बरेच दूर आहे. टाम्पा व परिसरात कोरोनाचा संसर्ग तेवढा तीव्र नाही. बोटावर मोजण्याइतक्‍या केसेस असल्या आणि संचारबंदी नसली तरी तेथील महापौरांनी आवाहन केल्यामुळे 5 मार्चपासून टाम्पातील रहिवासी घरातच थांबून आहेत. रस्ते निर्मनुष्य आहेत. तरीही अमेरिकेतील स्थितीबद्दल सराफ दाम्पत्याने त्यांचा अनुभव शेअर केला. 

कोटेकोर अंमलबजावणी 
अल्पना व अमोल म्हणाले, आमचे शहर तसे त्यापासून खूप दूर व सुरक्षित आहे. तरीही आम्ही महिनाभरापासून घरीच आहोत. आवश्‍यक सर्व साहित्य, पदार्थ साठवून ठेवले आहेत. या शहरातही प्रत्येकानेच "स्टे होम'ची काटेकोर अंमलबजावणी केली असून, अगदी घरातही सर्व सदस्य "सोशल डिस्टन्सिंग' गांभीर्याने पाळत आहेत. घरातूनच सर्व काम सुरू आहे. 

न्यूयॉर्कमध्ये भीषण स्थिती 
सर्वाधिक गंभीर बनलेल्या न्यूयॉर्क व कॅलिफोर्नियातील स्थितीबद्दल बोलताना अल्पना म्हणाल्या, अमेरिका अगदीच प्रगत राष्ट्र असले तरी न्यूयॉर्क व कॅलिफोर्निया ही शहरं अमेरिकेतील प्रवेशद्वार आहेत. आणि या जागतिक अर्थकेंद्राच्या शहरांमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने जगभरातून लोक येत असतात. त्यामुळेच याठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला. प्रशासन उशिरा जागे झाले आणि त्यामुळे इथली स्थिती भीषण बनली. रोज हजारो रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, शेकडोंच्या संख्येने लोक मरत आहेत. 

"स्टे होम'च एकमेव पर्याय 
कोरोनाचा प्रसार अत्यंत झपाट्याने होतो. सध्यातरी त्यावर उपचार नाही, त्यामुळे "स्टे होम' हाच एकमेव पर्याय आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व महाराष्ट्रातील सरकारने प्रभावी पावले उचलली. भारत सरकारचा जनता कर्फ्यू व लॉकडाउनचा निर्णय योग्य आहे, तो नागरिकांच्या हितासाठीच असून, लोकांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. भारतासारख्या विकसनशिल व मोठी लोकसंख्या असलेल्या देशात आरोग्य यंत्रणा अगदीच कमकुवत आहे, त्यामुळे भारतात अधिक काळजी घ्यावी लागेल. पुढे भीषण स्थिती उद्‌भवू द्यायची नसेल तर भारतीयांनी तीन आठवडे अगदी गांभीर्याने घरातच बसले पाहिजे. 

तनहाई सडको पर.. 
अमोल सराफ उत्कृष्ट आर्टिस्ट आणि रचनाकारही आहेत. त्यांनी त्यांच्याच शब्दात जगभरातील "लॉकडाउन' असलेल्या शहरांची स्थिती अत्यंत समर्पकपणे मांडलीय... "तनहाई सडकों पर आवारा.. मैं कैद कफसमें बेसहारा..' अशी सुरवात असलेल्या या रचनेत निर्मनुष्य रस्त्यांचे चित्र सामावलेय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon saraf husband wife america corona virus situation