देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन

जळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना पर्याय नाही. पुन्हा एकदा भाजप स्पष्ट बहुमत मिळवून मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार, असा विश्‍वास जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'च्या लाइव्ह मुलाखतीतून व्यक्त केला. "सरकारनामा' फेसबुक पेजवरील या मुलाखतीत त्यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीचा परामर्श घेतला. 

प्रश्‍न : येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहता? 
श्री. महाजन
: येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये गेल्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवत सर्व ठिकाणी सरकार स्थापन केले आहे. पंजाबचा अपवाद वगळता कॉंग्रेसकडे आज स्वत:च्या बळावर कुठलेही राज्य सत्तेत नाही. सक्षम नेतृत्वाचाही विरोधी पक्षाकडे अभाव आहे. एकाच कुटुंबाकडे नेतृत्व असल्याने त्याची अवस्था काय आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही मोदींना पर्याय नाही. त्यामुळे देशात नरेंद्र व राज्यात पुन्हा देवेंद्र हेच सक्षम नेतृत्व म्हणून सत्तेत राहील. 

प्रश्‍न : पालघर, जळगावपाठोपाठ आता धुळ्याच्या निवडणुकीबाबत आपले नियोजन कसे आहे? 
श्री. महाजन
: पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी सोपवली ती आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. पक्षाच्या सक्षम टीमच्या माध्यमातून आम्ही पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत यश मिळविले. जळगाव महापालिका निवडणुकीत विकासाचा शब्द दिला, जनतेने विश्‍वास दर्शविला आणि आम्हाला तीन चतुर्थांश मताधिक्‍य देत सत्ता सोपवली. दिलेल्या शब्दानुसार जळगाव शहरासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करून आणला, आणखी शंभर कोटी वर्षभरात आणू. आता पक्षाने धुळे महापालिकेची जबाबदारी सोपवली असून त्याठिकाणी सध्या आमचे केवळ तीनच नगरसेवक आहेत. मात्र, मंत्री डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल, शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या सहकार्यातून आम्ही "फिफ्टी प्लस'चे मिशन ठेवले आहे. त्यामुळे धुळ्यातही भाजपचाच महापौर होईल. 

प्रश्‍न : एवढा व्याप सांभाळून लोकांमध्ये आपण कसे रमता, एवढी ऊर्जा कशी येते? 
श्री. महाजन
: शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच आपण विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आलो आहे. लेझीम, ढोल-ताशे वाजविण्याची तरुण असल्यापासून सवय आहे. सर्वसामान्यांमध्ये राहून त्यांच्यात मिसळून आपण राहतो. आमदार किंवा मंत्री असलो तरी आपल्यात कार्यकर्ता हा स्थायी भाव असल्याने आजही मंत्रिपदाच्या व्यापातून आपण लोकांमध्ये रमत असतो. शिवजयंती, गणेशोत्सव, आंबेडकर जयंती अशा विविध मिरवणुकांमध्ये आपण लेझीम खेळतो, ढोलही वाजवितो. जामनेर मतदारसंघात पत्नी व मी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहोत. सुरवातीला सरपंच, नंतर 25 वर्षांपासून आमदार आणि आता मंत्री तर पत्नी जिल्हा परिषद सदस्य व आता नगराध्यक्ष म्हणून जनतेची सेवा करीत आहे. कार्यकर्त्यासारखे राहिल्याने जनतेचे प्रेम मिळत गेले, यापुढेही असे सेवाकार्य सुरूच ठेवू. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com