शाळा, महाविद्यालय परिसरातील  तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांना झटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

जळगाव : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही सर्रास विक्री करणाऱ्या चार दुकानदारांविरुद्ध सोमवारी (26 मार्च) रात्री अकराला रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. चौघांवर खटला दाखल करून न्यायालयात पाठविले असता न्यायालयाने प्रत्येकी 700 रुपयांचा दंड ठोठावला. 

महाराष्ट्र शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयाच्या एक हजार मीटरच्या परिघात, विडी, तंबाखू, गुटखा यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. असे असताना शहरातील अनेक शाळा, महाविद्यालय परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार आल्यावरून रामानंदनगर पोलिसांनी मू. जे. महाविद्यालय परिसरातील महाराजा पान सेंटर, स्नॅक्‍स व कोल्ड्रिंक्‍सचे दुकान, दूध विक्री केंद्र व चहाच्या टपरीवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यात लोकेश रघुनाथ मराठे, उदय रामराव पाटील, धनराज राजू गवळी व सुभाष चुनीलाल भावसार या चौघांविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये पोलिस कर्मचारी प्रदीप चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना न्यायालयात पाठविल्यावर न्यायालयाने प्रत्येकी 700 रुपये दंड ठोठावला. पोलिस निरीक्षक रोहोम यांच्या कारवाईने शाळा, महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्या आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कायदा पारित झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुदा पहिलीच कारवाई आहे.

Web Title: marathi news jalgaon school