मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळेत जाण्यास मज्जाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

जळगाव ः ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालयात आज 
पहिल्याच दिवशी शिक्षक व संस्थाचालक यांच्यात वाद उफाळला. काही तरुणांनी मुख्याध्यापकांसह 67 शिक्षकांना प्रवेशद्वारावरच अडवून आत जाण्यास मज्जाव केला. या प्रकारामुळे अर्धातास गोंधळ झाला. याबाबत शिक्षकांनी संस्थाचालकांसह दोन सुरक्षारक्षकांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

जळगाव ः ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालयात आज 
पहिल्याच दिवशी शिक्षक व संस्थाचालक यांच्यात वाद उफाळला. काही तरुणांनी मुख्याध्यापकांसह 67 शिक्षकांना प्रवेशद्वारावरच अडवून आत जाण्यास मज्जाव केला. या प्रकारामुळे अर्धातास गोंधळ झाला. याबाबत शिक्षकांनी संस्थाचालकांसह दोन सुरक्षारक्षकांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आर. आर. विद्यालयात आज सकाळी विद्यार्थ्यांचा "प्रवेशोत्सव' कार्यक्रम होणार होता. परंतु पावणेसातला सर्व शिक्षकांना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर संस्थाचालकांच्या तीन-चार माणसांनी अडवून आपल्याला आत जाऊ देण्यास संस्थाचालक अरविंद लाठी, प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी, चिटणीस मुकुंद लाठी, सदस्य विजय लाठी यांनी मनाई केली आहे, असे मुख्याध्यापकांना सांगितले. यावेळी मुख्याध्यापक डी. एस. सरोदे यांच्याशी वाद झाल्यावर संस्थाचालकांच्या माणसांनी मुख्याध्यापकांना धक्काब्बुकी केल्याचा आरोप शिक्षकांनी केला. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. 

अर्धातास गोंधळ 
आर. आर. शाळेचे तीन प्रवेशद्वार असून, दोन प्रवेशद्वार आज सकाळी बंद ठेवण्यात आले होते. तर मुख्य प्रवेशद्वाराचे केवळ लहान प्रवेशद्वार सुरू होते. विद्यार्थ्यांना आत प्रवेश करू दिला जात होता. मात्र, शिक्षकांना संस्थाचालकांनी आत प्रवेश न दिल्याने अर्धातास गोंधळ झाला. 

विद्यार्थ्यांचा उशिराने "प्रवेशोत्सव' 
मुख्याध्यापक व शिक्षकांनी महिनाभरापासून प्रवेश प्रक्रियेचे कामकाज केले. आज शाळेचा पहिल्या दिवस असल्याने विद्यार्थ्यांचा "प्रवेशोत्सव' करण्याचे नियोजन होते. त्यानुसार शिक्षक सकाळी आले. मात्र, संचालक मंडळाने शिक्षकांना शाळेत प्रवेश करू दिला नाही. या प्रकाराने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाऐवजी शिक्षकांचा प्रवेश गोंधळ घडला. नंतर उशिरा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव झाला. 

धक्काबुक्की झाल्याची पोलिसात तक्रार 
मुख्याध्यापक सरोदे यांना आत येण्यास संस्था अध्यक्ष अरविंद लाठी यांच्या सागण्यावरून सुरक्षारक्षक योगेश झनके, दिलीप सोनवणे यांनी मज्जाव करून धक्काबुक्की केली. याबाबत मुख्याध्यापक डी. एस. सरोदे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. दुपारी मुख्याध्यापक सरोदे यांच्यासह शिक्षकांनी जिल्हापेठ पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहे. 

शिक्षणाधिकाऱ्यांचे सरोदे यांना पत्र 
मुख्याध्यापक सरोदे यांना संस्थेने निलंबित केले होते. दरम्यान, शिक्षणाधिकारी यांनी सरोदे यांना रुजू करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे डी. एस. सरोदे शाळेच्या पहिल्या दिवशी हजर राहण्यासाठी गेले होते. परंतु मुख्याध्यापक बेकायदेशीर कारभार पाहत आहेत, असे दिशाभूल करणारे पत्र शाळेच्या प्रवेशद्वारावर संस्थाचालकांनी लावले होते. 

मुख्याध्यापकांचे उपसंचालकास पत्र 
घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याध्यापक सरोदे यांनी नाशिक शिक्षण विभागाचे उपसंचालक यांना पत्र दिले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी संचालकांनी सर्व शिक्षकांना अडवून विद्यार्थ्यांचा प्रवेशाला विलंब झाल्याने चुकीचा संदेश पालकांपर्यंत गेला आहे. याबाबत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन पुढील आदेश निर्गमित करावे, अशी विनंती केली आहे. 

असा आहे वाद...
दोन वर्षांपूर्वी शिक्षकांनी संस्थाचालकांच्या विरोधात मानसिक छळाबाबत पोलिस, शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून अनेकदा शिक्षक व संस्थाचालक यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानुसार मुख्याध्यापकांच्या बडतर्फीच्या आदेशावर दाखल केलेल्या सुनावणीवर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 

मुख्याध्यापक सरोदे यांना संस्थेने बडतर्फ केले आहे. याबाबत उपसंचालकांकडे पत्र दिले आहे. तरी देखील आज शाळेत सरोदे येऊन प्रवेश करत असताना सुरक्षारक्षकाने अडविले असता त्याला शिक्षकांनी मारहाण केली. सुरक्षारक्षाने शिक्षकांविरुद्ध तक्रार दिली आहे. 
- अरविंद लाठी, संस्थाध्यक्ष, ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी

Web Title: marathi news jalgaon school teacher