"शब-ए-बारात'ची नमाज रात्रभर घरातच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

जिल्हा पोलिस दलातर्फे "शब-ए-बारात'ची नमाज आणि प्रार्थना घरात करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यावतीने करण्यात आले होते.

जळगाव  : मुस्लिम बांधवांनी "शब-ए-बारात'ची नमाज गुरुवारी  आपापल्या घरी अदा केली. जिल्हा पोलिसदलातर्फे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोन दिवसांपूर्वीच आवाहन करून नमाज घरातच अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. "शब-ए-बारात'च्या रात्री शहरातील जवळपास 52 मशिदी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. कब्रस्तान मैदानालाही चारही बाजूंनी कुलूपबंद करून तशी माहिती देण्यात आली होती. पोलिस दलाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरात प्रार्थना करून "लॉकडाउन'चे ठिकठिकाणी पालन केले. 

रमजान पर्व सुरू होण्याअगोदर "शब-ए-बारात'च्या प्रार्थनेसाठी मुस्लिम बांधव रात्रभर मशिदींमध्ये प्रार्थना करतात. तसेच कब्रस्थानात जाऊन पुर्वजांसाठी प्रार्थनाही केली जाते. मात्र, यंदा देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण सुरू असल्याने लॉकडाउनची परिस्थिती आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे "शब-ए-बारात'ची नमाज आणि प्रार्थना घरात करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच पोलिस ठाण्यांच्या पातळीवर मुस्लिम समाजातील प्रतिनिधींशी संपर्क करून त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. रात्री आठला सर्व मशिदींमधून "ईशा'ची अजान होऊन प्रार्थनेस सुरवात झाली. रात्रभर मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरातच नमाज अदा केली. 

पोलिसांचा खडा पहारा 
पोलिसदलाने आवाहन करुनही तरुण टवाळखोर तरुणांचा उपद्रव होण्याची शक्‍यता पाहता पोलिसदलाने शहरात चोख बंदोबस्त पाळला होता. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढविण्यात येऊन जमाव एकटणार नाही, याची संपूर्ण काळजी पोलिसदलाने घेतली होती. रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात पोलिस विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करून वाहने जप्त करीत असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरल्याचे पाहायला मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Shab-e-Barat's prayer at home all night muslim Society