शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांसमोर विरोधकांकडून उमेदवाराचा शोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव : शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघातील झंझावातामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार कोण? याची आता उत्सुकता आहे. 

जळगाव : शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघातील झंझावातामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार कोण? याची आता उत्सुकता आहे. 

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची जळगाव ग्रामीण मतदारसंघात मजबूत पकड असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद सदस्यपदापासून तर आमदार आणि मंत्रिपदापर्यंत याच मतदारसंघातून त्यांनी मजल मारली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघात कार्य करण्याकडे विशेष लक्ष दिले असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, शासन निधी यातून शेतरस्ते, तसेच पुलांची उभारणी करण्यात आली तर वाघूर धरणातून थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बंदिस्त पाइपलाइनने 195 कोटींची योजना कार्यान्वित केली असून, त्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही राज्यातील पहिली योजना असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उन्मेष पाटील यांना तब्बल 65 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे आजच्या स्थितीत जळगाव ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टीने एकतर्फी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. 
"जळगाव ग्रामीण'चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार गुलाबराव देवकर हे पुन्हा या मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे संकेत होते. मात्र, जळगाव नगरपालिका घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील निकालात त्यांना शिक्षा झाल्याने आजच्या स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तुल्यबळ असा उमेदवार नाही. 

...यांची नावे आहेत चर्चेत 
गुलाबराव देवकर यांचे पुत्र विशाल देवकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार यांची उमेदवारी भक्कम मानली जात आहे. तर धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांच्या नावाचीही चर्चा आहे. शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्या कल्पिता पाटील यांचाही उमेदवारीचा दावा आहे. त्यांनी मतदारसंघात भेटीही सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसतर्फेही या मतदारसंघात मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण? याचीच अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shena gulabrav patil jalgaon gramin