निमित्त उद्‌घाटनाचे पण, चाचपणी मतपेटीची..! 

निमित्त उद्‌घाटनाचे पण, चाचपणी मतपेटीची..! 

पाचोरा : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच पाचोरा व भडगाव तालुक्‍यांचा म्हणजे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यामागे पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन व भडगाव येथील रजनीताई देशमुख महाविद्यालय इमारतीचे लोकार्पण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा हे निमित्त असले, तरी या दौऱ्यामागील गुपित लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मतपेटीची चाचपणी हेच असल्याचे आता बोलले जात आहे..! 


गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व छगन भुजबळ या दोघांनी पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दिग्गज नेत्यांच्या दौऱ्याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, दिलीप वळसे पाटील जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक सेलचे गफ्फार मलिक माजी खासदार वसंतराव मोरे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने छगन भुजबळ यांनी माळी महासंघाचा मेळावादेखील भडगाव येथे घेतला. शरदचंद्र पवार नेरीमार्गे पाचोरा येथे आले. या प्रवासादरम्यान त्यांनी पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांना आपल्या गाडीत बसवून घेतले. सुमारे दीड तासाच्या या प्रवासात दोघांमध्ये काय हितगूज झाले, हे दोघांव्यतिरिक्त तिसऱ्याला माहीत होणारे नाही. तसेच विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतरही श्री. पवार व श्री. वाघ हे एकाच गाडीने दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी गेले. तेथेही पातोड्याची भाजी व पोळीचे जेवण घेत असताना पवार यांनी मारलेल्या कोपरखळ्या आणि केलेला राजकीय विनोद राजकीय दिग्गजांना चक्रावून टाकणारा ठरला आहे. त्यामुळे पवार व भुजबळ यांच्या या धावत्या दौऱ्यामागे समोर येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका हेच खरे कारण असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. 

राष्ट्रवादीच्या गोटातूनही दबक्‍या आवाजात त्याची चर्चा सुरू आहे. म्हणूनच की काय, माजी आमदार वाघ मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्या भाजपच्या प्रवेशाबाबत मुद्दा उपस्थित झाला असता वाघ यांनी ही विरोधकांची चाल आहे, असे स्पष्टीकरण दिले. तेव्हा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिलीप वाघांचे बोलणे मध्येच थांबवत दिलीपराव आताच जाहीर करून टाका, की मी राष्ट्रवादी पक्षातच राहणार आहे. त्यांचे हे विधान ऐकून दिलीप वाघांनी पुन्हा आपल्याला राष्ट्रवादीने व पवार साहेबांनी भरपूर दिले आहे. त्यामुळे इतर कुठे जाण्याचा प्रश्नच नाही आपण कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीतच असल्याबाबतचा पुनरुच्चार केला. 

भुजबळांची शेरोशायरी 
छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत व शेरोशायरी करत आपल्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. कोणाचेही नाव न घेता भाजप, शिवसेनेवर सडकून टीका केली; तर श्री. पवार यांनी नोटाबंदी, बोंडअळी अनुदान, कर्जमाफी, इंधनाचे वाढते भाव यासोबतच मोदींनी केलेल्या विविध घोषणांचा खरपूस समाचार घेतला. या दौऱ्यादरम्यान माजी मंत्री गुलाबराव देवकर, अरुणभाई गुजराथी यांच्याशी देखील पवारांनी निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ही एक प्रकारची ऊर्जा मिळाली आहे. 
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची या दौऱ्यादरम्यान चाचपणी झाली असून, पाचोरा विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी दिलीप वाघ यांनाच निश्‍चित असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे हा दौरा हॉस्पिटल व महाविद्यालय इमारत उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने असला, तरी त्यात पवार व भुजबळ यांनी आपली राजकीय खेळी पूर्ण केली, यात दुमत असण्याचे कारण नाही. तसेच या दौऱ्यामुळे विरोधकांना देखील धडकी भरली असून, पवार व भुजबळांची जादू काय करामत करते याबाबतच्या साधक-बाधक प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com