खासदारांसह मंत्र्यांना आमदारांचे आव्हान 

खासदारांसह मंत्र्यांना आमदारांचे आव्हान 

पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील या दोघांना जनतेसमोर येऊन त्यांनी केलेल्या कामांचा खुलासा करण्याचे खुले आव्हान पुन्हा एकदा दिल्याने निवडणुकांचा धुरळा जास्तच गडद झाला आहे. मंत्री महाजन व खासदार पाटील हे आव्हान स्वीकारून त्याचा कशा पद्धतीने खुलासा देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

केंद्र व राज्यात शिवसेना भाजपची युती असली, तरी गेल्या चार वर्षांपासून दोघांत जणू काही खो-खोचा खेळ सुरू आहे. दोघे एकमेकांवर उघड व छुप्या पद्धतीने आरोप- प्रत्यारोप करीत असले, तरी "तुझे माझे जमेना अन्‌ तुझ्या वाचून करमेना' अशी दोघांची अवस्था आहे. असे असताना समोर येऊन ठेपलेल्या निवडणुकांसाठी दोघांत युती "जैसे थे' ठेवण्याबाबत हालचाली सुरू आहेत. युती होवो अथवा न होवो, परंतु पाचोरा मतदारसंघात निर्माण झालेले दोघांतील वैमनस्य कळसाप्रत पोहोचले आहे. 

आमदार किशोर पाटील भाजपच्या नेत्यांवर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात परस्पर विरोधी तक्रारीवरून दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे दोघांतील मतभेद किती विकोपाला गेले, याची साक्ष देतात. आमदार पाटील यांनी चार वर्षांच्या आमदारकीच्या काळात केलेल्या 594 कोटी रुपये खर्चाच्या विविध नावीन्यपूर्ण विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी व निवडणूकप्रसंगी मतदारांना दिलेल्या वचनांची कशा पद्धतीने पूर्तता केली, हे जाहीरपणे व पुराव्यांसह स्पष्ट करण्यासाठी 3 फेब्रुवारीला "जनसंवाद विकासासाठी' हा कार्यक्रम घेतला. त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. चार तासांच्या या जनसंवादात सुमारे 150 प्रश्नांच्या आधारे आमदार पाटील यांनी विकासकामांचा पाढा वाचला. वेळेअभावी काही प्रश्न शिल्लक राहून गेल्याने इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या प्रश्नांच्या संदर्भातही स्पष्टीकरण देण्याची ग्वाही आमदारांनी दिली. 

याप्रसंगी जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यात बहुतांश प्रश्न सिंचन व जलसंधारण कामांसंदर्भात होते. त्यांचे स्पष्टीकरण करताना आमदार पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर निशाणा साधला. प्रथम काही दिवस महाजनांकडून कामे होतील या अपेक्षेने मी त्यांच्यासोबत राहिलो. कामे करून घेण्यासाठी मागणी व पाठपुरावा केला. मात्र निराशा पदरात पडली. असे सांगून "भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला' अशी बोचरी टीका त्यांनी केली. महाजनांच्या रूपाने जिल्ह्याला महत्त्वाचे मंत्रिपद मिळालेले असताना त्यांनी जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात एकही ठोस काम केले नाही. आरोग्यदूत, प्रती मुख्यमंत्री, संकटमोचक या उपाधी लावून घेणाऱ्या मंत्री महाजनांनी जनसेवक होणे महत्त्वाचे समजावे, असा सल्लाही आमदार किशोर पाटील यांनी दिला. एवढ्यावर न थांबता, मंत्री महाजनांनी माझ्याप्रमाणेच जनतेच्या दरबारात येऊन केलेल्या कामांसंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असे खुले आव्हान दिले. बलून बंधारे, नदीजोड यासह सिंचनाबाबतच्या इतर कामांसंदर्भात मंत्री महाजनांच्या घोषणांचा समाचार त्यांनी घेतला. "लबाडा घरचे आमंत्रण जेवल्यावर खरे' अशी टर उडवली. 

खासदारांवर टीका 
मतदारसंघातील काही विकासकामांसंदर्भात हे काम आपले की खासदारांचे? असा प्रश्न जनसंवाद कार्यक्रमात जनतेकडून आल्यावर आमदार पाटील यांनी खासदार ए. टी. पाटील यांच्याही कार्यपद्धतीवर टीका केली. खासदारांनी देखील जनतेसमोर येऊन आपल्या कामांचा लेखाजोखा मांडावा. केवळ रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे म्हणजे मतदारसंघाचा विकास करणे नव्हे, याचे त्यांनी भान ठेवावे आणि माझ्या कामाचे श्रेय घेऊ नये, असा खुलासा आमदारांनी केला व जो कामे करतो तो जनते समोर येऊन ताठ मानेने काय केले ते सांगतो. हे लक्षात घेऊन मंत्री महाजन व खासदार पाटील यांनी जनतेसमोर येऊन काय कामे केली व पुढे काय करणार, हे जाहीरपणे सांगावे असे खुले आव्हान दिले. 
 

मंत्री, खासदारांच्या उत्तराची उत्कंठा 
यावेळी माजी आमदार तथा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे दावेदार आर. ओ. पाटील यांनीही खासदार ए. टी. पाटील यांच्यावर शरसंधान साधत "केवळ रेल्वे गाड्या थांबवल्या, आता तुम्हालाही जनता थांबवेल', अशी टीका केली. लोकसभा निवडणुकांची रणभेरी निनादली असताना आमदार पाटील यांनी मंत्री महाजन व खासदार पाटील यांना जाहीरपणे दिलेले आव्हान निवडणुकांचा वणवा जास्तच दाहक करणारे ठरले आहे. या आव्हानाला मंत्री महाजन व खासदार पाटील कशा पद्धतीने उत्तर देतात, याकडे लक्ष लागून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com