शिवाजीनगरातील लोकांना मृत्यूनंतरही यातना! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने, 
त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शिवाजीनगरात असलेल्या स्मशानभूमीत लाकडांसह विविध सोयी-सुविधा नसल्याने त्यांना अंत्ययात्रा जीव धोक्‍यात घालून चालत रेल्वेरूळ ओलांडून न्यावी लागत आहे. त्यामुळे शिवाजीनगरातील लोकांना मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. 

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो नव्याने बांधण्यासाठी जुना पूल तोडण्याचे काम 25 फेब्रुवारीपासून सुरू झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्ग हा सुरत रेल्वेगेट व असोदा रेल्वेगेट देण्यात आल्याने रेल्वे गेट बंद राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन तासन्‌तास वाहतूक कोंडीत थांबावे लागत आहे. त्यात जवळचा पर्यायी मार्ग नसल्याने आठ ते दहा किलोमीटरच्या फेऱ्याने नागरिकांना यावे लागत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अनेकदा रूळावरून वर्दळ असल्याने रेल्वे थांबविणे, गेट बंद असल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात आज सकाळी ख्रिश्‍चन कब्रस्तानाजवळील रहिवासी ललाचंद किसन परदेशी (वय 72) यांचे अल्प आजाराने निधन झाले. जवळच शिवाजीनगरातील स्मशानभूमी होती. परंतु या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकूड नसल्याने अंत्यसंस्कार कसे करावेत, हा प्रश्‍न पडला होता. त्यामुळे शेवटी परदेशी परिवाराला तहसील कार्याजवळील रेल्वेरूळावरून चालत जाऊन अंत्ययात्रा काढावी लागली. 

शिवाजीनगरातील स्मशानभूमी सुविधाविना 
शिवाजीनगरातील स्मशानभूमीत गेल्या पाच महिन्यांपूर्वी तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी विविध कामे करण्यात आली. परंतु काही दिवसांनंतर या स्मशानभूमीत असुविधा त्याचबरोबर लाकूडही नसल्याने लोकांना बाहेरून लाकूड आणावे लागत असे. आता लाकूड आणण्यासाठी रेल्वेगेटने येणे, त्यात उशीर होणे, असा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अंत्ययात्रा रेल्वेरूळ ओलांडून चालत चार किलोमीटर नेरीनाका येथील स्मशानभूमीत जावे लागत आहे. 

शहरात चार ते पाच स्मशानभूमी 
महापालिका प्रशासनाचे नेरी नाका, शिवाजीनगरातील तसेच मेहरुण, पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्षच होत आहे. शहरात केवळ नेरी नाका येथील स्मशानभूमी सुस्थितीत असली, तरी तेथे अनेकदा लाकूड नसल्याची समस्या निर्माण होते. तसेच मेहरुणमधील शिवाजी महाराज उद्यानाजवळील स्मशानभूमी व पिंप्राळा येथील स्मशानभूमीत सुविधांचा वानवा आहे. 

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 
शहरात चार-पाच स्मशानभूमी असून, त्यात महापालिकेतर्फे सुविधा पुरविली जाते. परंतु नेरी नाका सोडून अन्य स्मशानभूमीत सुविधा नसल्याने त्या-त्या परिसरातील लोक तसेच लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, तरी महापालिका प्रशासन या स्मशानभूमीत सुविधा देत नसल्याचे चित्र आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivaji nagar death railway crossing