शिवाजीनगरवासींच्या त्रासाला सत्तेतील भाजपच जबाबदार : गुलाबराव देवकर

live photo
live photo

जळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत. त्यास गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेत असलेला भाजपच जबाबदार आहे. या परिसरातील हजारो नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे, असे प्रतिपादन लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी केले. 
शिवाजीनगर भागात आयोजित संवाद यात्रेत ते बोलत होते. राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील यांच्यासह परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. देवकर म्हणाले, की पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे होते. तो नसल्यामुळे येथे कुणी आजारी पडल्यास ऍम्ब्युलन्स वेळेवर येऊ शकत नाही. आग लागली तर पाण्याचे बंब येऊ शकत नाही. याचे पाप कुणाच्या माथ्यावर घेणार? शालेय मुलांना त्रास होतो. पूल बांधण्यास कुणाचा विरोध नाही. मात्र, ज्या घिसाडघाईने निर्णय घेतला तो संशयास्पद आहे. तहसीलजवळील एक अस्थायी रेल्वेगेट व्हावे, ही मागणी रास्त आहे. मी धरणगाव येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा अगोदर एक अस्थायी रेल्वेगेट मंजूर करवून घेतले होते, त्यानंतरच पुलाच्या कामास सुरवात केली. येथे तसा विचार कुणीही केला नाही. "वाय' आकारातील पूल हा वास्तवतेला धरून असताना "टी' आकाराच्या पुलाचा अट्टाहास का करण्यात आला? 
हा प्रश्‍न केवळ शिवाजीनगर भागातील जनतेचा नाही, तर ममुराबाद, इदगाव, चोपडा, किनगाव या भागातून शहरात येणाऱ्या लाखो लोकांचा आहे. आज सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा फटका या लाखो नागरिकांना नाहक बसत आहे. स्थानिक वृत्तपत्रांनीही हा प्रश्न मांडला तरी सत्ताधाऱ्यांना घाम फुटत नाही, हे आपले सर्वांचे दुर्दैव आहे, असेही देवकर म्हणाले. यावेळी शिवाजीनगर भागातील लोकांनी देवकर यांना उत्स्फूर्त पाठींबा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com