शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल होणार इतिहासजमा 

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल होणार इतिहासजमा 

जळगाव : ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक उद्यापासून (ता. 25) बंद करण्यात येणार असून, पोलिस बंदोबस्तात पुलाच्या खोदकाम केले जाणार असल्याने दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या शिवाजीनगरचा पूल आता इतिहासजमा होणार आहे. 
शिवाजीनगरला जोडण्यासाठी ब्रिटिशांकडून सुमारे दीडशे वर्षांपूर्वी शिवाजीनगरचा उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. या पुलाची कालमर्यादा संपुष्टात आलेली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याकडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या पहिल्या टप्प्यात पुलावरून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या खोदकामाला उद्यापासून (ता. 25) सुरवात करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी दोन्ही बाजूंची वाहतूक आज सकाळपासूनच बंद केली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. 

खोदकामासाठी लागणार तीन आठवडे 
शिवाजीनगरच्या रेल्वे उड्डाणपुलावर डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच पुलाच्या खाली मोठ्या आकाराचे गर्डर टाकण्यात आले आहे. या लोखंडी गर्डरपर्यंत या पुलाचे खोदकाम करावयाचे असल्याने यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. 

साडेचार तासांचा "मेगाब्लॉक' 
पहिल्या टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या दुसऱ्या टप्प्यात पूल तोडण्याचे काम 25 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी साडेचार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त करण्यासाठी मुंबई येथून मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन क्रेन मागविण्यात आल्या आहेत. तसेच शंभर विशेष कर्मचाऱ्यांचे पथक देखील या कामासाठी बोलविण्यात आले आहे. यामध्ये मुंबई येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कामगारांचा सहभाग आहे. 

पूल तोडण्यासाठी पोलिसांची कुमक 
पुलाचे खोदकाम करताना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून राज्य शासनाला पोलिसांचा बंदोबस्त मिळण्यासाठी पत्र देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांकडून पूल तोडत असताना पोलिस बंदोबस्तात पुलाचे खोदकाम करण्यात येणार आहे. जोपर्यंत पोलिस बंदोबस्त पूल खोदकाम करण्याच्या ठिकाणी येणार नाही, तोपर्यंत पुलाच्या कामाला सुरवात करण्यात येणार नसल्याचेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नागरिकांची होणार फरफट 
शिवाजीनगरच्या या ब्रिटिशांकालिन रेल्वे उड्डाणपुलावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. सोमवारी हा पूल तोडण्यात येणार असल्याने शिवाजीनगरातून येणाऱ्या नागरिकांची चांगलीच फरफट होणार आहे. 

प्रजापतनगर ते भादली रेल्वेगेटपर्यंत पर्यायी मार्ग 
ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढीव वस्ती तयार झाली आहे. या ठिकाणाहून शहरात येण्यासाठी शनिमंदिर व शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल हे दोन मार्ग होते; परंतु आता हे दोन्ही मार्ग बंद झाल्यामुळे या ठिकाणावरील नागरिकांची चांगलीच पंचाईत होणार आहे. त्यामुळे रेल्वेरुळांलगत असलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढून, तसेच त्या ठिकाणी भर टाकून आसोदा - भादली रेल्वेगेटपर्यंत रस्ता तयार केल्यास ममुराबादमार्गे होणारी वाहतूक या ठिकाणाहून वळविल्यास सुरत रेल्वेगेटवर होणारी कोंडी काही प्रमाणात दूर होणार आहे. 

पर्यायी मार्ग आता अमळनेर चौकीच 
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल तोडण्यास उद्यापासून (ता. 25) प्रारंभ करण्यात येत आहे. प्रशासनाने पर्यायी मार्गाची सुविधा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने कोणतीही सुविधा केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना आता अमळनेर रेल्वे चौकी मार्गाचाच पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा फेरा पडणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com