पूल तोडण्याचे काम सुरू; "लाइफलाइन' विस्कळित 

live photo
live photo

जळगाव : वाहतुकीस कोणताही पर्याय न देता शिवाजीनगरचा रेल्वे उड्डाणपूल आजपासून तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. शिवाजीनगरातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी अमळनेर रेल्वे चौकी हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शिवाजीनगरवासीयांसह परिसरातील नागरिकांना याचा फटका बसला. वाहतूक बंद केल्यानंतर काही वेळातच या मार्गावर कोंडी झाली. पर्यायी मार्गाअभावी "लाइफलाइन'च विस्कळित झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हेतुपुरस्सर राजकारणातूनच ही कोंडी करण्यात आली आहे, असा सूरही जनतेतून व्यक्त होत आहे. 
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला आजपासून सुरवात करण्यात आली. सकाळी दहाला पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. या ठिकाणी रेल्वेतर्फे फलक लावून, तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच दोन्ही मार्गावर लाकडी कठडे, तसेच पत्रे लावून वाहतूक बंद करण्यात आली. 
 
साडेदहाला वाहतूक विस्कळित 
शिवाजीनगर रेल्वे पूल बंद झाल्यानंतर एकमेव पर्याय असलेल्या अमळनेर चौकीकडून वाहतूक वळविण्यात आली. संपूर्ण वाहतूक त्या मार्गाने वळविल्यानंतर अवघ्या अर्धा तासात वाहतूक विस्कळित झाली. रेल्वे आल्यामुळे अमळनेर रेल्वे चौकीचे गेट बंद झाले अन संपूर्ण वाहतूक थांबली तब्बल "राजा ट्रॅक्‍टर'पर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. 

शालेय परीक्षार्थींचे हाल 
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहे. शिवाजीनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी जात आहेत. अशा स्थितीत केवळ एकच मार्ग असल्याने काही विद्यार्थीही या वाहतूक कोंडीत अडकले होते. विद्यार्थ्यांमध्ये अक्षरश: पळापळ सुरू होती. त्यांच्यासोबतचे पालकही संतप्त भावना व्यक्त करीत होते. 

वाहने ठेवून पायीच काढला रस्ता 
परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत काही जणांनी आपली वाहने तेथेच ठेवून पायीच जाणे पसंत केले. विद्यार्थी अक्षरश: धावत पळत निघत होते. आपण रेल्वेरूळ ओलांडत आहोत, याचेही भान त्यांना नव्हते. गेट बंद असतानाही जीव धोक्‍यात घालून ते गेटच्या खालून निघत होते. 

राजकारणातून जनतेची कोंडी 
जळगाव शहरात सुरू असलेल्या राजकारणातून हेतुपुरस्सर शिवाजीनगरवासियांची कोंडी केली जात असल्याची भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. ऐन परीक्षा काळात हा पूल तोडण्याची गरज होती काय? दोन महिने मुदत घेतली असती काय बिघडले असते? प्रजापतनगरच्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजीनगरचे काम सुरू केले असते तर पर्यायी मार्गही राहिला असता; परंतु हे काम आताच सुरू करून हेतुपुरस्सर नागरिकांची कोंडी करण्यात आली असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. 

मते मागणारे नगरसेवक गायब 
शिवाजीनगरसह परिसरातील जनतेची कोंडी झालेली आहे. मात्र, याच पर्यायी मार्गासाठी मोठमोठे फलक लावणारे आज नगरसेवक झाले आहेत. ते मात्र कुठेच पुढे आलेले दिसले नाही, तर शिवाजीनगर, इंद्रप्रस्थनगर भागातील नगरसेवकही गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहे. 

आजारी व्यक्ती जाणार कुठून? 
शिवाजीनगरातून गावात जाण्यासाठी अमळनेर रेल्वे चौकी एकमेव पर्यायी मार्ग आहे. मात्र, त्या ठिकाणीही रेल्वेगेट बंद झाल्यास वाहतुकीची आता मोठी कोंडी होत आहे. जर आजारी व्यक्तीस तातडीने रुग्णालयात न्यावयाचे असल्यास तो रुग्णालयात पोहोचणेही आता कठीण आहे. कारण आता शिवाजीनगरातून गावात जाण्यासाठी अमळनेर रेल्वे चौकीशिवाय एकही पर्याय नाही. 

घिसाडघाईचा निर्णय : सुभाष शौचे 
भाजपचे माजी महानगराध्यक्ष सुभाष शौचे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, याबाबत त्यांनी म्हटले आहे, की शिवाजीनगरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. अशा स्थितीत पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याची गरज होती. त्याबाबत अनेक वेळा मागणीही करण्यात आली होती. मात्र, कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अत्यंत घिसाडघाईने पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ हा जनतेच्या जिवाशी हेतुपुरस्सर खेळ होत असून, या प्रकरणी कोणतीही अप्रिय घटना घडल्यास संबंधितावर दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com