जळगाव- धुळे मार्गावर नव्याने शिवशाही सेवा! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळात दाखल झालेली "शिवशाही' बससेवा अनेक मार्गावर सुरू आहे. यात जळगाव- धुळे मार्गावर विनावाहक सेवा सुरू होऊन बंद झाली होती. यानंतर आता नव्याने जळगाव- धुळे मार्गावर शिवशाही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यात आता वाहक राहणार असून तीन थांबे देखील देण्यात येणार आहेत. 

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळात दाखल झालेली "शिवशाही' बससेवा अनेक मार्गावर सुरू आहे. यात जळगाव- धुळे मार्गावर विनावाहक सेवा सुरू होऊन बंद झाली होती. यानंतर आता नव्याने जळगाव- धुळे मार्गावर शिवशाही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यात आता वाहक राहणार असून तीन थांबे देखील देण्यात येणार आहेत. 

एसटी महामंडळातर्फे आरामदायी बससेवा "शिवशाही' नावाने दाखल करण्यात आली आहे. या बहुचर्चित शिवशाही बस आरामदायी बैठकव्यवस्था, पुश बॅक, "एसी'सह सीसीटीव्ही कॅमेरे, एअर सस्पेन्शन शॉक अब्ज असून, बसची आसनक्षमता 43 आहे. या सुविधांमुळे प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होतो. ही शिवशाही बससेवा जळगाव- पुणे मार्गावर सुरू आहे. तसेच धुळ्यासह आगारापर्यंत सेवा सुरू आहे. शिवशाहीमधून आरामदायी प्रवास करण्यासाठी अन्य बसच्या तुलनेत प्रवाशांना लवकर पोहचविता यावे; याकरिता विनावाहक सेवा सुरू करण्यात आली होती. 

1 ऑक्‍टोबरपासून सुरवात 
जळगावहून धुळे जाण्यासाठी अगदी तास- दीड तासाने बस धावत आहेत. यात आता शिवशाही बसची सेवा जोडण्यात येत आहे. म्हणजे शिवशाही बसमधून आरामदायी प्रवासाची सेवा येत्या 1 ऑक्‍टोबरपासून जळगाव विभागाकडून सुरू करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले. यामध्ये दिवसभरातून जळगावहून तीन आणि धुळे विभागाकडून तीन शिवशाही बस सोडण्यात येणार आहेत. 

दोन थांबे अन्‌ वाहक 
जळगाव- धुळे मार्गावर यापूर्वी सुरू केलेली शिवशाही बससेवा ही विनावाहक होती. यामुळे ही बस जळगावहून सुटल्यास न थांबता थेट धुळे जात होती. परिणामी यात जळगावहून जितके प्रवासी बसलेले असतील तेवढेच प्रवासी घेऊन बस धुळे धावत होती. या सेवेला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे शिवशाहीची विनावाहक सेवा बंद करावी लागली होती. यात पुन्हा सेवा सुरू केली जात असून यामध्ये वाहक असणार आहे. यासोबतच एरंडोल आणि पारोळा हे दोन थांबे देण्यात आले असून येथून प्रवासी घेऊन जाईल. यामुळे आता या सेवेला किती प्रतिसाद मिळतो; हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivshahi bus dhule