हंगामी भाडेवाढीत "शिवशाही'चा प्रवास स्वस्त! 

हंगामी भाडेवाढीत "शिवशाही'चा प्रवास स्वस्त! 

जळगाव ः "एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने होत असलेल्या दरवाढीने आता पुन्हा दिवाळीमध्ये दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या भाडेवाढीतून "शिवशाही' बससेवा वगळण्यात आली आहे. यामुळे दिवाळीत लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी शिवशाही स्लिपर कोचमधून आरामदायी प्रवास स्वस्तात करावयास मिळणार आहे. 
एसटी महामंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या हंगामात दहा टक्के भाडेवाढ करण्यात येते. यंदाच्या हंगामात 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान वीस दिवसांसाठी दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी दिवाळी सुटीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. परंतु, दिवाळीत होणारी भाडेवाढ अनेकदा महामंडळाच्या पथ्यावर पडत असते आणि अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या गर्दीच्या हंगामात मिळत असते. तरी देखील महामंडळाचा हंगामी भाडेवाढीचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र यंदा भाडेवाढ करताना केवळ लालपरी आणि परिवर्तन बससाठी करण्यात आले असून, यातून "शिवशाही' बसची भाडेवाढ वगळण्यात आली आहे. 
 
पुण्याचा प्रवास परवडणारा 
परिवहन महामंडळाची शिवशाही बस खासगी ट्रॅव्हल्सला टक्‍कर देणारी ठरत आहे. लग्नसराई किंवा दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची लूट करत मनाप्रमाणे दुप्पट भाड्याची आकारणी केली जाते. यात दिवाळीमध्ये जळगाव- पुणे मार्गाचा विचार केल्यास ट्रॅव्हल्सचे स्लिपर कोच भाडे एक हजार ते 1200 रुपयांपर्यंत जाते. इतर वेळेस सातशे ते आठशे रुपये असते. पण महामंडळाच्या शिवशाही स्लिपर कोच बसचा विचार केल्यास जळगाव- पुणेसाठी 975 इतके भाडे आहे. जे इतर वेळी महागात पडणारे असले, तरी गर्दीच्या हंगामात प्रवाशांना परवडणारे आहे. महामंडळाची भाडेवाढ झाल्यानंतर शिवशाही व्यतिरिक्‍त अन्य बसचे भाडे वाढणार असून, शिवशाहीचे जे आहे तेच भाडे राहणार आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत शिवशाही स्लिपर कोचचे भाडे कमी राहणार असल्याने पुण्याचा प्रवास आवाक्‍यात राहणारा असेल. 
 
आरक्षणात "भरली की चालली' 
दिवाळीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे जळगाव विभागाकडून पुण्यासाठी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये बारा शिवशाही बसचा समावेश आहे. प्रामुख्याने मुक्‍ताईनगर, यावल, अमळनेर, जळगाव येथून शिवशाही सुटणार असून, जळगाव व चोपडा येथील स्लिपर कोच बस सोडण्यात येणार आहे. शिवाय पुढील आठवड्यापासून आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, आरक्षणानंतर बस पूर्ण बुक झाल्यानंतर लागलीच दुसरी बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ही आरक्षणाची सुविधा साध्या बससाठी देखील आहे. 
 

दिवाळीच्या हंगामासाठी दहा टक्‍के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला असून, यात शिवशाही बसचा समावेश नाही. तसेच हा गर्दीचा हंगाम "कॅश' करण्यासाठी जादा बसचे नियोजन करून प्रवाशांना तत्पर सेवा देण्याचे नियोजन आहे. 

- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com