भाजपच्या फलकावर झळकले शिवसेना नेते गुलाबराव 

live photo
live photo

जळगाव : मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला असताना मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणाऱ्या पक्षाच्या अधिकृत फलकावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र झळकल्याने भाजपत एकच खळबळ उडाली, तर अन्य राजकीय पक्षांमध्ये हा मोठ्या चर्चेचा विषय बनला. दरम्यान, नजरचुकीने किंवा आपल्यावरील प्रेमापोटी हे झाल्याचे गुलाबरावांनी सांगितले. तर, मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून "अतिथी देवोभव' या संस्कृतीनुसार गुलाबरावांचे छायाचित्र टाकले तर बिघडले कुठे, असे स्पष्टीकरण भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी "सकाळ'शी बोलताना दिले. 
दीपनगर औष्णिक वीजप्रकल्प व जळगावात अमृत अभियानातील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजनासह जैन इरिगेशन कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (30 मार्च) जिल्ह्यात येणार होते. भाजपमधील एकूणच गटबाजीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या दौऱ्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नसला तरी पक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताचे मोठे फलक शहरभर लावले होते. आमदार सुरेश भोळेंनी उमविला बहिणाबाई चौधरींचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या जाहीर आभाराचे फलक उभे केले होते, रक्षा खडसे व लेवा पंचायतीनेही अशा फलकांमधून ऋण व्यक्त केले. तर जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून "कणखर मुख्यमंत्र्यांचे दमदार स्वागत' या "टॅगलाइन'खाली स्वागताचे फलक विविध चौकात, प्रमुख मार्गावर झळकले होते. 

गुलाबराव "ऑड मॅन' 
मात्र, पक्षाच्या या फलकांवर "ऑड मॅन' म्हणून शिवसेनानेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र झळकल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनीच तोंडात बोटे घातली. विशेष म्हणजे हे पक्षाचे अधिकृत फलक होते, त्यावर 6 एप्रिल या पक्षस्थापनेच्या दिवशी मुंबईत होणाऱ्या मेळाव्याबाबत आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, पाटलांचे छायाचित्र झळकल्याने दिवसभर या विषयाची जोरदार चर्चा सुरु होती. काही माध्यमांनी तर गुलाबरावांना थेट "भाजपत प्रवेश करताय का' असेही विचारून टाकले. सत्तेत असूनही भाजप-सेनेतील विळ्या-भोपळ्याचे वैर सर्वश्रुत आहे. भाजपसह मोदी, शहांवर कठोर टीका करण्याची एकही संधी सेनानेते सोडत नसताना भाजपच्या फलकावर शिवसेनानेत्याचे छायाचित्र कसे झळकले? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

भाजपच्या फलकावर माझे छायाचित्र असण्याचे कारण नाही. नजरचुकीने हे झाले असेल किंवा माझ्यावरील प्रेमाखातर कुणी ते टाकले असेल तर त्याबद्दल मला काही माहीत नाही. आम्ही सत्तेत एकत्र आहोत, त्यामुळे भाजपत जाण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 
 गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री 

राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांप्रमाणेच गुलाबराव पाटीलही शहरातील कार्यक्रमांना हजर राहणार होते, त्यामुळे "अतिथी देवोभव' या उक्तीनुसार त्यांचे छायाचित्र टाकले, त्यात अयोग्य असे काहीच नाही. 
उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com