अरे हा आव्वाऽऽज कुणाचा? क्षीण झालेला..! 

अरे हा आव्वाऽऽज कुणाचा? क्षीण झालेला..! 

"अरे हा आव्वाऽऽऽज कुणाचा..? शिवसेनेचाऽऽऽ', अशी घोषणा आली की शिवसैनिक आले आहेत. त्यांचे जनतेसाठी कोणते तरी आंदोलन आहे. अशी ओळख एकेकाळी शिवसेनेची होती. मात्र, आज केंद्रात व राज्यातील सत्तेच्या वाट्यात त्यांच्या घोषणेसह दराराही क्षीण झाला झाला आहे. सत्तेत असल्यावर आंदोलन करता येत नाही, हे निश्‍चित आहे. मात्र, त्याच आधारावर संघटनेचे बळकटीकरण केले जाते. भाजपने गेल्या पाच वर्षांत तेच केले. परंतु मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला ते फारसे साध्य करता आलेले नाही, हेही तितकेच खरे आहे. 


राज्यात लोकसभेत मुंबईसह इतर ठिकाणी शिवसेनेने यश मिळविले आहे. परंतु, त्याच यशाच्या बळावर विधानसभेचे गणित मांडले जात असले, तरी खानदेशात मात्र विधानसभेत शिवसेनेची कसोटी आहे. एका राज्यमंत्रिपदाच्या बळावर भाजपच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा मोठे यश मिळविण्याचा कठीण डोंगर शिवसेनेचे "वाघ' कसे साध्य करणार, याचीच परीक्षा आहे. कॉंग्रेस पक्षाच्या बालेकिल्यात कोणत्याही पक्षाला पाय रोवणे कठीण होते. मुंबईत वाढलेली शिवसेना राज्यातही वाढविण्यास सुरवात झाली होती. त्या काळात खानदेशात शिवसेनेला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. प्रारंभी पक्षाकडे कार्यकर्तेच नव्हते तर नेते कसे असणार? परंतु त्या काळी गावातील दोन चार युवकांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची शाखा सुरू केली जात होती. हेच युवक त्यावेळी गावात प्रत्येकाला मदत करण्यासह त्यांच्या तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात जाऊन कामाच्या समस्या सोडवीत होते. वेळप्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाबही आणत असत. यात त्यांच्यावर केसेसही झाल्या, मारही बसला. परंतु, त्यातून शिवसेना तावून सुलाखून निघाली. अगदी ग्रामीण भागातही शिवसेनेचे फलक झळकू लागले. जनतेच्या विविध प्रश्‍नांवर आंदोलन, हाच शिवसेनेचा आत्मा होता. त्याकाळी शिवसैनिकांनी तो पाळला. 

सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदेश मुंबईहून सुटला, की शिवसैनिक त्याप्रमाणे कार्य करीत होते. त्यामुळे शिवसेनेचा बंद म्हटले, की "बंद'च... दुसरे काहीही नसायचे. आंदोलनातून बळकट होत असलेल्या शिवसेनेने राजकारणात सहभाग घेतला. परंतु, त्यावेळी ग्रामीण भागात जाणेही शक्‍य होत नसलेल्या भाजपशी मैत्री झाली. प्रारंभी शिवसेनेने खानदेशात आपली राजकीय ताकद चांगलीच निर्माण केली होती. सन 2004 च्या निवडणुकीचा विचार केल्यास खानदेशात अक्राणी मतदारसंघातून शिवसेनेचे उदेसिंग पाडवी विजयी झाले होते. नंदुरबारमध्ये शिवसेनेचे निंबाजी गायकवाड, शिंदखेड्यात रामकृष्ण पाटील, धुळे मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे, कुसुंबा मतदारसंघात प्रा. शरद पाटील यांनी कॉंग्रेसला कडवी लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. याच वेळी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने मुसंडी मारत चोपडा, एरंडोल, पाचोरा मतदारसंघात यश मिळविले होते. भुसावळ, जळगाव मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. 2009 मध्ये शहादा मतदारसंघातून उदेसिंग पाडवी, धुळे ग्रामीणमधून शरद पाटील यांनी यश मिळविले होते. पाटील यांनी कॉंग्रेसचे रोहिदास दाजी पाटील यांचा पराभव केला होता. जळगाव जिल्ह्यातही एरंडोल मतदारसंघात सेनेने यश मिळविले होते. 

सन 2014 मध्ये शिवसेना व भाजप स्वतंत्र एकमेकांच्या विरोधात लढले. त्याचा फायदा शिवसेनेपेक्षा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला. धुळे व नंदुरबारमध्ये शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही, तर दुसऱ्या क्रमांकाची मतेही पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली नाहीत. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला पाचोरा, चोपडा व जळगाव ग्रामीणच्या तीन जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. मात्र एरंडोल, मुक्ताईनगर मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेला मिळाली. 


सत्तेमुळे आंदोलन करणे कठीण 
सन 2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली. या सत्तेत प्रारंभी जिल्ह्यात शिवसेनेला सत्तेचा वाटा मिळाला नाही. परंतु, कालांतराने शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांना सहकार राज्यमंत्रिपद मिळाले. सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेने जिल्ह्यात आंदोलने करणे कठीण झाले. सत्तेतील मित्रपक्ष भाजपकडे असलेल्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाच्या तुलनेत शक्ती कमी असल्याने सत्तेची ताकदही जास्त दाखविणे शक्‍य झालेले नाही. धुळे मतदारसंघात शिवसेनेकडे मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून पालकमंत्रिपद आलेले आहे, ही एकच जमेची बाजू आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा शिवसेनेला फारसा झालेला नाही. आता विधानसभेत युती झाल्यास सत्तेच्या सहभागाच्या आधारावर खानदेशात वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये यश मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com