ज्येष्ठांच्या "स्मार्ट कार्ड' नोंदणीसाठी गावांत एजंट! 

ज्येष्ठांच्या "स्मार्ट कार्ड' नोंदणीसाठी गावांत एजंट! 

जळगाव ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रवासदरांच्या सवलतींसाठी "स्मार्ट कार्ड' अनिवार्य केले आहे. यात पहिल्या टप्प्यात निम्म्या भाड्याची सवलत घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना "स्मार्ट कार्ड' देण्यात येत आहे. या कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीमार्फत एजंट नेमण्यात आले आहेत. हे एजंट गावागावांमध्ये जाऊन ज्येष्ठांची नोंदणी करीत आहेत; परंतु यासाठी अतिरिक्‍त वीस रुपये आकारले जात आहेत. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे "स्मार्ट कार्ड'च्या वितरणास मे महिन्यात प्रारंभ करण्यात आला. "स्मार्ट कार्ड' योजना येण्यासाठी विलंब झाला असून, प्रत्येक बस आगारात ऑनलाइन सिस्टिम तयार केल्यानंतर "स्मार्ट कार्ड'ची नोंदणी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अपंग आणि सवलतधारकांना "स्मार्ट कार्ड' वितरित करण्यात येत आहेत. महामंडळाचे "स्मार्ट कार्ड' हे प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्डला जोडले जाते. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर ठेवून आधार कार्डशी संलग्न केले जाते. आधार कार्डवरील माहिती महामंडळाच्या "स्मार्ट कार्ड'वर नोंदविल्यानंतर प्रत्येक महामंडळाच्या प्रवाशाला "स्मार्ट कार्ड' वितरित केले जाणार आहे. आधार कार्ड "स्मार्ट कार्ड'शी संलग्न करण्यासाठी 55 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी बसस्थानकात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या रांगा लागतात. यामुळे त्रास सहन करावा लागतो. हे काम "क्‍लायमॅक्‍स' कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीतर्फे ज्येष्ठांचा त्रास कमी करण्यासाठी एजंट नेमण्यात आले आहेत. 

एजन्सीचे एजंट गावांमध्ये 
बसस्थानकात येऊन "स्मार्ट कार्ड'च्या ऑनलाइन नोंदणीसाठी बसस्थानकात अधिक गर्दी होत असते. ती कमी करण्यासाठी एजन्सी प्रत्येक गावागावांत पोचून नोंदणी करण्याचे काम करीत आहे. महिनाभरापूर्वी एजन्सीने एजंट नेमले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 40 एजंटची नेमणूक करण्यात आली असून, 25 जण कार्यरत आहेत. "स्मार्ट कार्ड'च्या ऑनलाइन नोंदणीसाठी एकाकडून 50 रुपये शुल्क घेतले जातात; परंतु गावागावांमध्ये जाऊन नोंदणी करणाऱ्या एजंटकडून वीस रुपये अधिक आकारत 70 रुपये शुल्क घेतले जात आहेत. 
 
विद्यार्थ्यांना "रिचार्ज'साठी सुविधा 
सायबर सेंटर असलेल्या ठिकाणी एजंट कार्यरत असून, आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन ते नोंदणी करू शकतील. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले "स्मार्ट कार्ड' दर महिन्याला "रिचार्ज' करावे लागत असते. या विद्यार्थ्यांना "स्मार्ट कार्ड' "रिचार्ज' करण्यासाठीची सुविधा एजन्सीने नेमलेल्या एजंटमार्फत करता येणे शक्‍य आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com