सर्पदंश झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पथराड (ता. धरणगाव) येथील 14 वर्षीय मुलीला सर्पदंश झाल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयात सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने, तसेच डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. 

पथराड (ता. धरणगाव) येथील 14 वर्षीय मुलीला सर्पदंश झाल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयात सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने, तसेच डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. 
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळ्यातील रहिवासी सुनील मांगो पाटील यांची मुलगी कविता (वय 14) ही नववीचे शिक्षण घेत असून शिक्षणासाठी आजी बेबाबाई पाटील (रा.पथराड) यांच्याकडे राहत होती. गेल्या आठवड्यात एक जुलैला मध्यरात्री अडीचच्या सुमारास कविता झोपेत असताना विषारी सापाने तिच्या हनुवटीजवळ दंश केला. संर्पदंश झाल्याने भांबावलेल्या मुलीला घेऊन कुटुंबीयांनी तत्काळ जिल्हा रुग्णालय गाठले. प्राथमिक उपचार केल्यानंतर सकाळी साडेसहाच्या सुमारास तिची प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. येथे व्हेंटिलेटरच उपलब्ध नसल्याने परिचारिकेने दुसरीकडे हलविण्यास सांगितल्यावरून कुटुंबीयांनी सकाळीच सातला मुलीला शाहूनगरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. 

जिल्हा रुग्णालयात "कट प्रॅक्‍टिस' 
कविताचे वडील सुनील पाटील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. मुलीच्या जिवावर ओढवलेल्या प्रसंगातून कर्ज काढून ते उपचार करीत होते. जिल्हा रुग्णालयात बेड खाली नसल्याचे सांगत खासगी रुग्णालयात हलविल्यानंतर तेथील अतिदक्षता युनिटचा खर्च न परडणारा होता म्हणून परत मुलीला जिल्हा रुग्णालयात आणले. जिल्हा रुग्णालयात कार्यरत दलालांकडून अडचणीत आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना थोड्याशा पैशांसाठी खासगीत हलविण्यास भाग पाडले जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. 

डॉक्‍टरांवर कारवाईची मागणी 
जिल्हा रुग्णालयात दाखल मुलीची प्रकृती डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे खालवत जाऊन तिचा मृत्यू ओढवला. वेळीच तिला अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असते तर, कदाचित माझी मुलगी वाचली असती. जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात आली आहे. 

Web Title: marathi news jalgaon snackbite girl daith