मांडळ येथील मुक्कामी बसला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

अमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास मांडळ मुक्काम बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

अमळनेरहून मांडळ येथे जाणारी बस रात्री साडे नऊला मांडळ येथे पोहचते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे बस (क्रमांक एमएच14 बीटी419) ही रात्री साडे नऊला मांडळला पोहचली होती. चालक व वाहक बसमध्ये किंवा टपावर झोपतात. मात्र, पाऊस असल्याने चालक सुशील हिरालाल चव्हाण व वाहक शरद गव्हाणे हे गावाबाहेरील गावदरवाज्या शेजारी झोपले होते. रात्री सुमारे दीडला बसला आग लागल्याची घटना समोर आली. 
चालक व वाहक बाहेर असल्याने ते बचावले आहेत. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्यास सुरवात केली. अग्निशामक दलाची गाडी बोलविण्यात आली होती. मात्र, तोपर्यंत आग विझवण्यास ग्रामस्थांना यश आले. या भीषण आगीत बसचा आतील भाग पूर्णपणे जळाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बस पेटली की पेटविली याबाबत अद्याप संशय असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, जळगाव येथील राज्य परिवहन विभागाचे पंकज महाजन, पी. एफ. धडे, आर. बी. देवरे, सुरक्षा अधिकारी जे. आर. पाटील, अमळनेर आगारप्रमुख बी. एम. बाविस्कर व वर्कशॉपचे पी. एन. बाविस्कर यांनी आज सकाळी नऊच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

Web Title: marathi news jalgaon st bus fire night