जळगाव विभागात बाराशे फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

जळगाव ः एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यभर पुकारलेल्या या "बंद'ला महामंडळाच्या जळगाव विभागात संमिश्र प्रतिसाद लाभला असून, जळगाव विभागात दिवसभरात होणाऱ्या एकूण फेऱ्यांमधून एक हजार 199 फेऱ्या रद्द झाल्या; तर काही बसफेऱ्या उशिरा झाल्यामुळे प्रवाशांना स्थानकातच ताटकळावे लागले. 

जळगाव ः एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यभर पुकारलेल्या या "बंद'ला महामंडळाच्या जळगाव विभागात संमिश्र प्रतिसाद लाभला असून, जळगाव विभागात दिवसभरात होणाऱ्या एकूण फेऱ्यांमधून एक हजार 199 फेऱ्या रद्द झाल्या; तर काही बसफेऱ्या उशिरा झाल्यामुळे प्रवाशांना स्थानकातच ताटकळावे लागले. 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री रावते यांनी एकूण चार हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. परंतु, मान्यताप्राप्त कामगार संघटना, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) या संघटनांतर्फे संप पुकारण्यात आला आहे. मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात केली. संपात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक मिळून जळगाव विभागातून तीन ते साडेतीन हजार कर्मचारी सहभागी झाले. प्रवाशांना संपाबाबत माहिती नसल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांवर बसफेऱ्या बंद झाल्याने ताटकळत थांबण्याची वेळ आली. 

चार आगारांत पूर्णपणे फेऱ्या बंद 
जळगाव विभागांतर्गत येणाऱ्या पंधरा आगारांमध्ये "बंद'ला संमिश्र प्रतिसाद लाभला. मात्र, विभागातील यावल, जामनेर, पाचोरा आणि एरंडोल या आगारांमध्ये पूर्णपणे "बंद' राहिला. या चारही आगारांमधून सकाळपासून एकही फेरी न सुटू देण्यात आली नाही; तर दुसरीकडे विभागाचे मुख्य बसस्थानक असलेल्या जळगाव आगाराच्या स्थानकातील फेऱ्या शंभर टक्‍के सुरू होत्या. यामुळे येथील प्रवाशांना फारशे ताटकळत राहावे लागले नाही. तर अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, मुक्‍ताईनगर, चोपडा या आगारांमधील फेऱ्या सकाळी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, दुपारनंतर येथील बसफेऱ्या सुरू झाल्या होत्या. 

74 टक्‍के काम बंद 
"एसटी'च्या "बंद'ला जिल्ह्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही विभागातून दिवसभरात होणाऱ्या एक हजार 776 बसफेऱ्यांपैकी एक हजार 199 फेऱ्या रद्द झाल्या; तर 577 फेऱ्या विभागातून झाल्या. यामुळे जळगाव विभागाचे आज दिवसभरातील काम केवळ 26 टक्‍केच झाल्याने विभागाला मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. 

प्रवासी ताटकळत उभे 
मध्यरात्रीपासून एसटी महामंडळातील कामगार संघटना व इंटक संघटनेने संप पुकारला होता. परंतु याबाबत प्रवाशांना माहिती नसल्याने अनेकजण बाहेरगावी जाण्यासाठी निघाले होते. पण ज्या आगारांमधून बस सुटल्याच नाहीत तेथील प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागला. तर काही ठिकाणाहून फेऱ्या उशिरा जात असल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागले. 
 

Web Title: marathi news jalgaon st strike