विद्यार्थ्यांविनाच भरली हातेडची शाळा 

विद्यार्थ्यांविनाच भरली हातेडची शाळा 

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षांकडून जिल्हा परिषदेच्या शाळांसह ग्रामपंचायतींना अचानक भेट देणे सुरू केले आहे. दरम्यान, चोपडा तालुक्‍यातील काही गावांना त्यांनी आज भेटी दिल्या. यामध्ये हातेड येथील के. के. विद्यालयासह शिवाजी विद्यालयाची पटसंख्या कागदोपत्री 127 आहे; मात्र प्रत्यक्षात शाळेत एकही विद्यार्थी नसल्याने पटावरील विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या शाळेत पटसंख्येपेक्षा शिक्षकांची संख्या जास्त असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी आज चोपडा तालुक्‍यातील अनेक गावांना भेट देत त्याठिकाणी पाहणी केली. यामध्ये हातेड येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्याक्रमांतर्गत के. के. विद्यालयातील विद्यार्थ्यांची पटसंख्या 127 इतकी आहे. मात्र, त्याठिकाणी शून्य उपस्थिती अध्यक्षांना दिसून आली. तसेच माध्यमिक विभागातील पाचवी, सहावी व सातवीच्या दोन- दोन तुकड्या आहेत. मात्र, त्यात देखील उपस्थितांसह हजेरी पुस्तकावरील पटसंख्येत मोठी तफावत असल्याचे अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या पाहणीत आढळले. 

शाळा विद्यार्थ्यांसाठी की शिक्षकांसाठी 
शाळेच्या पटसंख्या व विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच शाळेच्या दहा खोल्या रिकाम्या आहेत तर शिक्षकांची संख्या देखील पूर्ण आहे. मात्र, तरी देखील शिक्षकांकडून सर्व तुकड्या एकत्र भरविल्या जात असल्याने शाळा ही शिक्षकांसाठी आहे की विद्यार्थ्यांसाठी असा प्रश्‍न अध्यक्षा पाटील यांनी उपस्थित केला. 

वढोदा येथे पोषण आहारात अफरातफर 
चोपडा तालुक्‍यातील वढोदा येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळेत शाळेतील पटसंख्या व उपस्थिती यामध्ये देखील तफावत आढळून आली. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवून पोषण आहारात अफरातफर केली जात आहे. तसेच याठिकाणी तीनही अंगणवाडी एकत्र भरवल्या जात असून, पोषण आहारासाठी मिळणारे अनुदान खोटी आकडेवारी दाखवून लाटले जात असल्याचा आरोप उज्ज्वला पाटील यांनी केला. 

संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश 
आज झालेल्या पाहणीत अनुदान लाटण्यासाठी तसेच पोषण आहारात अफरातफर करण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. या सर्व प्रकरणाचा चौकशी अहवाल तयार करून कारवाई करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात आले असल्याचे उज्ज्वला पाटील यांनी सांगितले. 

दवाखान्याचा शौचालयासाठी वापर 
वाढोदा येथे आयुर्वेदिक दवाखान्यासाठी नवीन इमारत मंजूर झाली असून, त्याचे बांधकाम देखील झाले आहे; परंतु ठेकेदाराने या इमारतीचे बांधकाम अपूर्ण सोडले असून, त्या इमारतचा वापर नागरिक शौचालयासाठी करत असल्याचे दिसून आले. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा 
दवाखान्याच्या इमारतीचे काम अपूर्ण सोडून गेलेल्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे होते. तसेच त्यांनी त्याबाबतचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सादर करणे आवश्‍यक होते. मात्र, कर्तव्यात कसूर करून दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com