उष्माघाताचा कहर... सरकारी यंत्रणेसह नागरिकही उदासीन

residentional photo
residentional photo

मार्चमध्येच चाळिशी ओलांडलेले तापमान... एप्रिल- मे महिन्यातील उष्णतेचा कहर... आणि गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर गेलेला... त्यात लग्नसराईची धूम असल्याने नातलग, मित्रपरिवारातील लग्न चुकवू नये असा प्रघात.. मग, स्वत:सह कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता उन्हातान्हात दुचाकीवर फिरणे.. मिरवणुकांमध्ये सूर्य डोक्‍यावर असताना बेधुंद होऊन नाचणे... या प्रकारांना काय म्हणावे? त्यातूनच गेल्या आठवड्यात उष्माघाताने मृत्यू होण्याचे काही प्रकार समोर आलेत.. आठवडाभरात एकट्या जळगाव जिल्ह्यात पाच जणांचा बळी उष्माघाताने गेला.. असे असले तरी, या मृत्यूंबाबत सरकार दप्तरी "उष्माघाताचे मृत्यू' अशी नोंद नाही, हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल.. दुर्दैवाने जिल्ह्यातील ग्रामीण भाग तर दूरच मात्र, शहरी व तालुका स्तरावरही रुग्णालये व त्यातील उष्माघात कक्षांची अवस्था बिकट आहे. विशेष म्हणजे उष्माघाताने मृत्यू होण्याचे प्रकार समोर येत असताना आहे त्या ठिकाणच्या उष्माघात कक्षात यासंबंधी रुग्ण दाखल नसल्याचे "रेकॉर्ड' सांगते... 
 
उष्माघात रुग्णांची माहिती आरोग्य संचालक कार्यालयाकडून मागविण्यात येते. पण, उष्माघात रुग्णांची नोंदच केली जात नसल्याचे गेल्या काही वर्षांपासून पाहावयास मिळत आहे. उन्हाळा सुरू झाला की, जिल्हा आणि महापालिकेच्या रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू केला जातो. पण उन्हाळा संपून जातो तरी देखील एका रुग्णाची देखील नोंद या कक्षात होत नाही. विशेष म्हणजे उष्माघात होऊन अनेकांचे बळी गेले असताना शासनाची ही यंत्रणा मात्र सुस्तच असल्याचे या प्रकारावरून लक्षात येते. 


मृत्यूंची नोंदच नाही 
यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होऊन जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघातामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असला, तरी जिल्हा रुग्णालयात एकाही रुग्णांची उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. जळगावचे तापमान सध्या 45 अंशांवर आहे. उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका बेडचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला. परंतु या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अद्याप रुग्णच आले नाहीत. मात्र, खासगी रुग्णालयांत उन्हाच्या त्रासामुळे उद्‌भवणाऱ्या आजारांवर उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे पाहावयास मिळते. 

कसा होतो उष्माघात? 
रणरणत्या उन्हात सलगपणे काही तास काम केल्यानंतर उष्माघाताचा धोका अधिक असतो. तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेल्यानंतर अशा कडक उन्हात शरीरातील पाणी कमी होऊन शरीराचे तापमानही वाढते. त्यातून उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. साधारणपणे थकवा येणे, घशाला कोरड पडणे, धाप लागणे, उलट्या, भोवळ येणे, भूक न लागणे, डोके दुखणे, निरुत्साही होणे, अशक्तपणा जाणवणे यासारखी लक्षणे उष्माघाताची आहेत. 

काय काळजी घ्याल 
- उन्हात फिरणे टाळा 
- उन्हात शारीरिक कष्टाची कामे करू नये 
- भरपूर पाणी प्यावे 
- सैल, पांढरे, सुती कपडे घाला 
- गॉगल, टोपी, टॉवेल, उपकरणे वापरा 

उष्माघात झाल्यास काय करावे
- व्यक्तीस थंड ठिकाणी झोपवा 
- काखेत व मानेवर बर्फाच्या पिशव्या ठेवा 
- गार पाण्याने शरीर पुसावे 
- त्रास अधिक असल्यास रुग्णालयात न्यावे 


वाढलेल्या तापमानात काम करत राहिल्याने शरीरातील पाणी कमी होऊन शरीराचे तापमान वाढण्यास सुरवात होते. शिवाय क्षार निघून जाणे, सोडिअम, पोटॅशिअमचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीरातील संपूर्ण क्रियेवर परिणाम होऊन उष्माघात होण्याची शक्‍यता अधिक असते. यासाठी उन्हाळ्यात पांढऱ्या कपड्यांचा वापर उत्तम आहे. तसेच उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यास लिंबू सरबत पिणे, थंड पाण्याने अंग पुसत राहणे यासारखे घरगुती उपाय करता येतात. 

 डॉ. नरेंद्र जैन, एम.डी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com