सुरेशदादा जैन पुन्हा विधानसभेच्या मैदानात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 July 2019

जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज पत्रकारांना दिली. 

जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज पत्रकारांना दिली. 

महापालिकेत विरोधी पक्षनेत्याच्या दालनात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते. श्री. महाजन यांनी सांगितले, की सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे आधी जाहीर केले होते. त्यामुळे ते यावेळी निवडणूक लढविणार की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू होते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवावी अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून माजी महापौर नितीन लढ्ढा, राजू अडवानी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक विजय वाणी, श्‍याम कोगटा, प्रशांत नाईक व विष्णू भंगाळे आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी चालविली होती. याबाबत शनिवारी (ता. 29) जैन व त्यांच्या कुटुंबीयांशी देखील चर्चा केली. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. जळगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे युतीचे उमेदवार असतील. निवडून आल्यावर सहा महिन्यांतच जळगाव शहरातील मुदत संपलेले गाळे व हुडकोचा प्रश्न ते मार्गी लावतील. 

राजकारणाला कलाटणी? 
जळगाव विधानसभा मतदारसंघातून जैन तब्बल नऊ वेळा निवडून आले होते. गेल्यावेळी घरकुल प्रकरणात कारागृहात असतानाही त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे सुरेश भोळे त्यांच्या विरोधात निवडून आले. जैन यांनी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र महाजन यांनी जैन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने जळगावच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळणार आहे. महापालिकेवर सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व गेल्या 25 वर्षांपासून होते. यावेळी भाजपने त्यावर वर्चस्व निर्माण केले आहे. जिल्ह्यात आजही त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जैन यांच्याशी घट्ट मैत्री आहे. 

"घरकुल'च्या निकालाचे सावट 
जळगाव विधानसभेत भाजपचे सुरेश भोळे निवडून आल्यामुळे सद्यःस्थितीत ही जागा भाजपकडे आहे. त्यामुळे युतीत जागा वाटपात ही जागा भाजप शिवसेनेला सोडणार काय, याकडेच आता लक्ष राहणार आहे. मात्र, युती न झाल्यास जैन हे शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित असतील. तथापि, घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा येत्या 15 जुलै रोजी धुळे न्यायालयात निकाल लागणार असल्याने त्या निकालाचे सावटही जैन यांच्या उमेदवारी निश्‍चितीवर असणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sureshdada jain vidhansabha shivsena