खासगी सुरक्षारक्षक उद्योगातून  अडीच हजार जणांना रोजगार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

जळगाव : अलीकडे विविध ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांना मोठी मागणी आहे. खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या जिल्ह्यात जवळपास दहा-बारा संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभरात अडीच हजारांवर सुरक्षारक्षक काम करीत आहेत. या उद्योगक्षेत्रात दरमहा दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असून, शासनाच्या सुरक्षा मंडळाकडूनही सुरक्षारक्षक पुरविले जात आहेत. 

जळगाव : अलीकडे विविध ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांना मोठी मागणी आहे. खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या जिल्ह्यात जवळपास दहा-बारा संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभरात अडीच हजारांवर सुरक्षारक्षक काम करीत आहेत. या उद्योगक्षेत्रात दरमहा दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असून, शासनाच्या सुरक्षा मंडळाकडूनही सुरक्षारक्षक पुरविले जात आहेत. 
शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच, महावितरण, एसटी महामंडळ, सरकारी व अन्य सर्व बॅंका, वित्तीय संस्था, बॅंकांचे एटीएम, उद्योग-कंपन्या, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, व्यावसायिक प्रतिष्ठाने, गुदाम, मोठे बंगले आणि एवढेच नव्हे तर मोठ्या देवस्थानांच्या ठिकाणीही सुरक्षारक्षक तैनात केलेले आढळून येतात. मोठे कार्यक्रम, विवाह सोहळ्यांनाही वाहतुकीच्या नियमनाबरोबरच सुरक्षेसाठी या रक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे सुरक्षारक्षकांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वाभाविकच सुरक्षारक्षक पुरविण्याचा वेगळा उद्योग गेल्या दोन दशकांत चांगलाच नावारूपास आला, विकसित झाला. 

जळगावात दहा-बारा संस्था 
जळगाव शहरासह जिल्ह्यात खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या नोंदणीकृत दहा-बारा संस्था आहेत. यातील काही संस्था पुणे, मुंबईतील आहेत. बीआयएस, इगल यासारख्या मोठ्या व राज्यस्तरावर काम करणाऱ्या संस्थांनी नियुक्त केलेले अनेक सुरक्षारक्षक जळगाव जिल्ह्यात आहेत. काही नोंदणी नसलेल्या संस्थाही मर्यादित स्वरूपात सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम करत असल्याचे आढळून येते. 

अडीच हजारांवर रक्षक कार्यरत 
स्थानिक व बाहेरच्या अशा विविध संस्थांच्या माध्यमातून जळगाव शहरासह जिल्ह्यात अडीच हजारांपेक्षा जास्त सुरक्षारक्षक कार्यरत असून त्यापैकी बहुतांश जिल्ह्याबाहेरच्या एजन्सीने पुरविलेले आहेत. 

खासगी सुरक्षा मंडळाद्वारे पुरवठा 
खासगी सुरक्षारक्षकांशी संबंधित महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक कायदा 1981अन्वये या रक्षकांना किमान वेतनासह कामगारांशी संबंधित सर्वप्रकारच्या सुविधा व लाभ देण्याची तरतूद आहे. तसेच या कायद्यान्वये खासगी सुरक्षा मंडळ स्थापन करून त्याद्वारेच सुरक्षारक्षक भरती व नियुक्तीची प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. माथाडी कामगारांच्या अध्यक्षांना त्या-त्या ठिकाणी ही भरती करण्यासंबंधी अधिकार देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, काही ठिकाणी विशेषत: शासकीय कार्यालये, महावितरणमध्ये या मंडळाने पुरविलेले सुरक्षारक्षक आहेत. 
 
किमान वेतनासह सर्व सुविधा 
खासगी सुरक्षारक्षकांना कायद्यान्वये किमान वेतन देण्यासह कामगार कायद्यांतर्गत सर्व प्रकारच्या सुविधा, भविष्यनिर्वाह निधी, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी, बोनस, हक्काच्या व अन्य रजा, साप्ताहिक व सार्वजनिक सुट्यांचे लाभ देणे बंधनकारक आहे. गेल्या दोन वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने या सुविधा पुरविल्या जातात. सुरक्षारक्षकांना दरमहा सुमारे 7 ते 12 हजार रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाते. काही ठिकाणी रोजंदारी तत्त्वावरही सुरक्षारक्षक नेमले जातात. 
 
सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्था : 10 ते 12 
एकूण सुरक्षारक्षक : सुमारे 2550 
सुरक्षारक्षकांना वेतन : सरासरी 7 ते 12 हजार 
रोजंदारी तत्त्वावरील वेतन : 300 रुपये प्रतिरोज
 
 

Web Title: marathi news jalgaon surksharakshak rojgar