हगणदारीमुक्ततेच्या मुळावर पाणीटंचाई 

सुधाकर पाटील
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

भडगाव ः "जिथे प्यायला पाणी नाही, तिथे शौचालयासाठी पाणी कुठून आणायचे?' असा प्रश्न राज्यातील विशेषतः पाणी टंचाई निर्माण झालेल्या ग्रामीण भागातून विचारला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई हगणदारीमुक्ततेच्या मुळावर उठली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यात तब्बल 692 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ही आकडेवारी हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. पर्यायाने पाण्याअभावी ग्रामीण भागातील जनतेच्या हातात पुन्हा लोटा दिसू लागला आहे. 

अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाचे भूत राज्याच्या मानगुंटीवर बसले आहे. त्यामुळे शासनाने राज्यातील 151 तालुक्‍यात व 268 मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. दुसरीकडे पाणीटंचाई दिवसागणिक उग्ररूप धारण करीत असल्याचे चित्र आहे. काही भागात तर पिण्यासाठी नोव्हेंबरमध्येच भटकंती सुरू झाली आहे. 

58 लाख वैयक्तिक शौचालय 
राज्यात 2012 च्या "बेसलाईन' सर्वेक्षणानुसार शौचालय नसलेल्या कुटुंबांनी गेल्या पाच वर्षात स्वच्छ भारत अभियानांतर्गत 58 लाख 2103 वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. शौचालयांच्या बांधकामाच्या आकडेवारीवरून मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण महाराष्ट्र हगणदारीमुक्त म्हणून घोषित केला. मात्र, सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटामुळे वैयक्तिक शौचालयांच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. पुरेसे पाणीच नसल्याने शौचालयाचा वापर होत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. शासनाने राज्यातील 151 तालुके व 268 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. सध्या 14 जिल्ह्यात 692 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. डिसेंबरपासून टॅंकरची संख्या हजारावर जाण्याची शक्‍यता आहे. काही भागात तर आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शौचालयासाठी पाण्याचा वापर करणे टाळले जात आहे. 
 
शौचालयांसोबत द्यावे पाणी 
शौचालयांच्या वापरासाठी एका व्यक्तीला एका वेळेसाठी कमीतकमी 5 लिटर पाणी लागते. घरात सहा जण असतील तर दोन वेळेसाठी 60 लिटर पाणी लागते. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण तर दुसरीकडे शौचालयांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कुठून आणायचे? असा प्रश्न आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या हातात पुन्हा "लोटा' दिसू लागला आहे. अर्थात टंचाईमुळे हे चित्र दिसत असून शासनाने शौचालय बांधकामाबरोबर ग्रामीण भागात मुबलक पाणीही उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 
 
पाच वर्षातील वैयक्तिक शौचालये ... 58,02,103 
दुष्काळ घोषित तालुके ................ 151 
दुष्काळ घोषित मंडळे ................. 268 
राज्यात सध्या सुरू असलेले टॅंकर ... 692 

Web Title: marathi news jalgaon swacha hart mission pani tanchai