धरण उशाला कोरड घशाला 

live photo
live photo

जळगाव : राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उदासिनतेसह प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्‍यातील असोदा, भादली, चिंचोली यासह अनेक गावांमध्ये दुष्काळ व पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. गेली अनेक वर्षे या गावांमधील पाणीप्रश्‍न मार्गी न लागल्यामुळे अनेक कुटुंबीयांनी स्थलांतर करून शहराकडे धाव घेतली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या प्रश्‍नामुळे ही गावे ओस पडू लागत असल्याचे भयावह चित्र गावांमध्ये दिसून येत आहे. 
गेल्यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शहरात पूर्वी एक दिवसांआड पाणीपुरवठा केला जायचा; परंतु दुष्काळाची दाहकता लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे जळगावकरांना अद्याप दुष्काळाची झळ बसलेली नाही. मात्र शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेले शिरसोली, चिंचोली, कुसुंबा, आसोदा, भादली, बांभोरी यासह अनेक लहान लहान गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आसोदा येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाविरुद्ध पाण्यासाठी लढा देत आहेत. मात्र, राजकीय पुढाकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आजही या गावातील नागरिकांना दोन- तीन किलोमीटरपर्यंत पायी जाऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र या गावांमध्ये दिसून येत आहे. 

एकीकडे पाणी अन दुसरीकडे भटकंती 
शहरापासून अवघ्या आठ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसोली गावात अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर शिरसोली प्र.बो. आणि शिरसोली प्र.न. ही दोन गावे आहेत. या दोन्ही गावांमध्ये आठ ते दहा दिवसांतून एक तास पाणी सोडले जाते; परंतु शिरसोली प्र.बो.मध्ये पूर्वीच्या काळापासून पाण्याची टाकी बांधलेली असल्याने त्याठिकाणी 24 तास पाणी असल्याने त्याठिकाणी पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र, शिरसोली प्र.न. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याच प्रकारची उपाययोजना नसल्याने या गावातील नागरिकांना दुसऱ्या गावात जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. 

चिंचोलीत हंडाभर पाण्यासाठी पायपीट 
तापी नदीवर असलेले वाघूर धरण जळगावकरांना संजीवनी ठरले आहे. या धरणातून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, ज्या गावातून वाघूरचा पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे, अशा चिंचोली गावात देखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे येथील ग्रामस्थांना गावाशेजारी असलेल्या शेतातील विहिरीतून भर उन्हात डोक्‍यावर हंड्याने पाणी आणावे लागत असल्याचे परिस्थिती आहे. 

धरणे असून पाण्यासाठी वणवण 
जळगाव जिल्ह्यातून तापी, गिरणा यासह अनेक लहान मोठ्या नद्या वाहतात. या नद्यांवर दोन मोठी तर 13 लहान धरणे बांधण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पावसाळ्यात या धरणातील पाण्याचे योग्य साठवणूक तसेच त्याचे योग्य नियोजन होत नसल्याने जळगावकरांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

नदीकाठच्या गावांमध्येही पाणीटंचाई 
जिल्ह्यातून अनेक लहान-मोठ्या नद्या वाहत असल्याने ही निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे; परंतु या नद्यांलगत असलेले कानळदा, आव्हाणे, बांभोरी, चिंचोली यासह अनेक गावांमध्ये देखील आता पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या गावातील नागरिक सायकलच्या दोन्ही बाजूला कॅन लावून लांब वरून पाणी आणून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करीत आहे. 

पाच किलोमीटरहून आणावे लागते पाणी 
शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोदा, भादली गावात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पाणीटंचाईची भीषण समस्या आहेत. या गावात महिनाभरानंतर केवळ तासभर पिण्याचे पाणी येते. त्यामुळे या गावातील नागरिक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जळगावातून सायकल, मोटारसायकलसह मोठ्या वाहनातून पाणी भरून आणत असल्याचे चित्र त्याठिकाणी दिसून येते. 

विहिरी कोरड्याठाक; जलस्त्रोतही आटले 
दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे विहिरींचे नैसर्गिक स्रोत देखील आटले असून, गावातील विहिरींमधील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे या गावातील विहिरी देखील कोरड्या पडलेल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

आमच्या शिरसोली प्र. बो. गावात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आठवडाभरापेक्षा जास्त दिवस पाणी साठवून ठेवावे लागते. घरातील पाणी संपल्यास गावात असलेल्या पाण्याची टाकीतून दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी आणावे लागते. 
अशोक बारी (ग्रामस्थ, शिरसोली प्र. बो.) 

शिरसोलीमध्ये दापोरा येथील धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईची समस्या नाही. मात्र शिरसोली प्र.न.मध्ये पाणीटंचाईची समस्या असून, त्या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. 
अरुण बारी (ग्रामस्थ, शिरसोली) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com