शिल्लक दोन कोटी निधी खर्चाचा मार्ग मोकळा!! 

शिल्लक दोन कोटी निधी खर्चाचा मार्ग मोकळा!! 

जळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाईची बिकट स्थिती असताना पाणी पुरवठा विभागाकडे गत वर्षाचा शिल्लक असलेल्या दोन कोटी रुपये इतक्‍या निधी खर्च रोखून ठेवण्यात आला होता. हा निधी खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी हा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 58 गावात पाणी टंचाई असून या गावात तब्बल 39 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या शिवाय जिल्ह्यातील टंचाई कामाचे प्रत्येक तालुकानिहाय प्रस्तावही आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सन 2018-19 अंतर्गत 2 कोटी 95 लाख 61 हजार 601 रुपयाचे टंचाई निवारण्याचे प्रस्तावही निधी मंजुरीसाठी होते. मात्र, याउलट गेल्या वर्षाचा म्हणजे सन 2018-19चा दीड कोटीहून अधिक रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे शिल्लक असताना तो खर्च करण्यास मंजुरी नव्हती. यामुळे टंचाईवरील उपाययोजनेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. 

2 कोटी खर्चास मंजुरी 
जिल्ह्यासाठी टंचाई अंतर्गत 2018-19 या वर्षामध्ये वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी शिल्लक असलेल्या निधीतून सन 2017-18 या आर्थिक वर्षातील टंचाई अंतर्गत विंधन विहीर व कूपनलिका खोदकामासाठी 1 कोटी 10 लाख व उर्वरित 1 कोटी 47 हजार इतका निधी शिल्लक होता. हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली नव्हती. मात्र हा निधी टंचाई असलेल्या गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 2018-19 या वर्षात घेण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी खर्च करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. अर्थात जिल्ह्यातील टंचाईसाठी 36 कोटी 24 लाख रुपयांचा आराखडा मंजूर असून, आता शिल्लक असलेल्या दोन कोटी 10 लाख 47 हजार रुपयांचा निधीला मंजुरी मिळाल्याने उपाययोजना राबविता येतील. 
 
अमळनेर, चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक टॅंकर 
पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवू लागल्याने उपाययोजनांमध्ये देखील वाढ होत आहे. जिल्ह्यातील 58 गावांमध्ये 39 टॅंकर सध्या स्थितीला सुरू असून, यात चाळीसगाव (13) आणि अमळनेर (15) या तालुक्‍यात सर्वाधिक टॅंकर सुरू आहेत. तसेच जळगाव 1, भुसावळ 5, मुक्‍ताईनगर 1 आणि पारोळा 4 टॅंकर सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com