शिक्षण विभागाने आदर्श पुरस्कार यादी दडपलेलीच! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

जळगाव ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतात. यंदा मात्र खरी गुणवत्ता असलेले आदर्श शिक्षक नव्हे; तर मर्जीतली गुणवत्ता दाखविणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप सुरू आहे. यामुळेच शिक्षण विभागाकडून आजही पुरस्काराची यादी जाहीर न करता दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, आजचा नियोजित कार्यक्रम रद्द होण्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांना वेळ नसल्याचे कारण पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून पुढे केले जात आहे. 

जिल्हा परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी यंदा शिक्षण समितीच्या सभेत गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कार दिला गेला पाहिजे, असा ठराव करण्यात आला होता. ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जावी, अशी मागणीही होती; परंतु दरवर्षापेक्षा यंदाचे चित्र उलटे झाले असून, ठराव झाला असताना पुरस्कारावरून नाट्य घडत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शी झाली की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मुळात पुरस्कारासाठी होणारी "लॉबिंग' पाहून यादी अजूनही गुपित ठेवण्यात आली आहे. नाशिक विभागीय आयुक्‍तांकडून यादी मंजूर झाल्यानंतरही त्यात हस्तक्षेप सुरू असून, शिक्षण विभागाकडून पुरस्कार देण्यात येणाऱ्या शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. 
 
पालकमंत्र्यांना वेळ नसल्याने कार्यक्रम रद्द? 
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज आयोजित करण्यात आला होता; परंतु ऐनवेळी तांत्रिक कारण पुढे करीत कार्यक्रम रद्द करण्यात आला. मुळात नावांमध्ये फिरवाफिरव सुरू असल्याने हा घोळ निर्माण झाला आहे. शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा गतवर्षी माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सवडीनुसार घेण्यात आला होता. यंदाही शिक्षक दिनी कार्यक्रम होऊ शकला नाही. ऐनवेळी कार्यक्रम रद्द होण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना वेळ नसल्याचे कारण पदाधिकारी व अधिकारी यांच्यामधून बोलले जात आहे; परंतु दोन दिवसांपूर्वीच यादी आयुक्‍त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाली असताना, ती प्राप्त नसल्याचेही सांगितले जात होते. यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेपच होत असल्याचे उघड होत आहे. 

शिक्षण विभागाकडून पुरस्काराची यादी आज मिळाली असून, पुरस्कार वितरण सोहळा ज्या दिवशी होईल, त्यापूर्वी नावे जाहीर करण्यात येतील. यासाठी कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्‍चित केलेली नाही. 

- उज्ज्वला पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, जळगाव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon teacher award not dicleration