शिक्षकाच्या बदली रद्दसाठी एकवटले ग्रामस्थ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

जळगाव ः बिलवाडी (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पाटील यांना सप्टेंबर 2018 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्‍त ठरवत त्यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांसह शालेय समिती एकवटली आहे. शिवाय, याबाबत सीईओ डॉ. पाटील यांना आज निवेदन देण्यात आले. 

जळगाव ः बिलवाडी (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पाटील यांना सप्टेंबर 2018 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्‍त ठरवत त्यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांसह शालेय समिती एकवटली आहे. शिवाय, याबाबत सीईओ डॉ. पाटील यांना आज निवेदन देण्यात आले. 
बिलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा ही पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून, 121 इतकी पटसंख्या आहे. या ठिकाणी पाच शिक्षक आहेत. यात संदीप पाटील यांनी शाळेत सेवा करत असताना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेतील पटसंख्या वाढविली आहे. शाळा डिजिटल केली असून, सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. शाळेत इतके चांगले काम करताना संदीप पाटील यांना सप्टेंबर 2018 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्‍त ठरवून त्यांची बदली करण्यात आली. शैक्षणिक वर्ष आता सुरू झाले असताना गेल्या वर्षीच्या संच मान्यतेवरून त्यांची बदली करण्यात आली आहे. मुळात संदीप पाटील यांच्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. आता सप्टेंबर 2019 मध्ये पुन्हा संच मान्यता होणार असून, आजच्या स्थितीला शाळेत पूर्ण पटसंख्या असल्याने केवळ दोन महिन्यांसाठी उपशिक्षक पाटील यांची बदली करू नये व बदलीचे दिलेले आदेश मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर बदली रद्दचे आदेश दिले नाही, तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे दाखले काढून घेत दुसऱ्या शाळेत दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती धोंडू जगताप, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, शरद पाटील, रामकृष्ण मराठे, धनराज पाटील, वसंत उमरे, गोविंदा गायकवाड आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon teacher transfer cancal bilvadi