जळगाव 43 अंशांवर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

जळगाव ः शहराचे तापमान दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. कालपासून एका अंशाने वाढ झाली असून, हवामान विभागात किमान तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नोंदविले गेलेले तापमान यंदाचे आतापर्यंतचे उच्चांकी ठरले आहे. 

जळगाव ः शहराचे तापमान दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. कालपासून एका अंशाने वाढ झाली असून, हवामान विभागात किमान तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नोंदविले गेलेले तापमान यंदाचे आतापर्यंतचे उच्चांकी ठरले आहे. 
जळगावातील तापमानात आता रोज वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुढील तीन-चार दिवस पारा असचा कायम राहणार असून, येत्या काही दिवसांत शहरातील तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्‍यता आहे. आज शहरातील कमाल तापमान 43, तर किमान 25 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वाढलेल्या तापमानामुळे दुपारी बारानंतर रस्त्यांवरून चालणे कठीण बनले आहे. डांबरी रस्ते आणि उन्हाचा तडाखा यामुळे उष्णतेचा दाह वाढला आहे. तीव्र झळांमुळे शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. महामार्गावरील रहदारीही दुपारी कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. 

झळा होताय असह्य 
जळगावचे तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उष्णता वाढली आहे. रस्त्यावरून जाताना बसणाऱ्या झळा असह्य होत आहेत. सकाळी साडेदहापासूनच झळांचा त्रास जाणवत आहे. महामार्ग, रस्त्यावरून जाणेही कठीण होत असल्याने दुपारी बारापासून रस्त्यांवरील वर्दळ कमी झालेली पाहावयास मिळत आहे. 

शीतपेये, सावलीचा आधार 
झळा वाढल्यामुळे दुपारी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक सावली शोधत आहेत. तसेच उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळावा, यासाठी शीतपेयांत ज्यूस, आइस्क्रीम, लस्सी, मठ्ठा, ऊसरस पिताना दिसत आहेत. यात रस्त्यांवर ठिकठिकाणी लागलेल्या मठ्ठा हातगाड्यांवर नागरिकांची अधिक गर्दी होत आहे. 

पाच दिवसांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

8 एप्रिल........42 
9 एप्रिल........42.4 
10एप्रिल......42.6 
11 एप्रिल.....43 
12 एप्रिल.....43 
 

Web Title: marathi news jalgaon temprature 43 degri