जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची चिन्हे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जळगाव ः चैत्र महिन्यात वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यासह शहराच्या तापमानात काही अंशी घट होऊन गारवा निर्माण झाला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमान वाढीस लागले आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याने साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पुढील आठवडाभरात जिल्ह्याच्या तापमानात आणखी वाढ होणार असून, उष्णतेची लाट येण्याचा इशारा शासनाच्या (आयएमडी) अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आला आहे. 

गेल्या आठवड्यात जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला वादळासह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे काही दिवस तापमानात गारवा निर्माण झाला. मात्र, पुन्हा दोन दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ होत असून तापमानाने पुन्हा चाळिशीचा आकडा पार केला आहे. दिवसागणिक तापमानवाढीमुळे सकाळपासून कडक उन्हाच्या झळा जळगावकरांना सोसाव्या लागत आहेत. तापमानात होणाऱ्या बदलामुळे थंडी-तापासह सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा यासह साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, शहरातील रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. तसेच वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जात आहे. 

तापमानवाढीची शक्‍यता 
वादळी पावसामुळे शहराच्या तापमानात घट होऊन तापमानान 37 अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र, पुन्हा उन्हाची तीव्रता वाढल्याने तापमानाने पुन्हा चाळिशीकडे वाटचाल केली असून, आज शहराचे तापमान 40.8 अंश सेल्सिअस नोंद आज करण्यात आली आहे. परंतु पुढील काही दिवस तापमानात वाढ होऊन तापमान उच्चांक गाठणार असल्याचा इशारा "आयएमडी' या संकेतस्थळाने दिला आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्याचा सल्ला 
येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याने चक्कर येणे, घाम सुटणे, जीव घाबरणे यांसह उष्माघात होण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडून उपचार करणे आवश्‍यक असल्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. 

गेल्या आठवडाभरातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 
14 एप्रिल 43.26 
15 एप्रिल 43.00 
16 एप्रिल 39.28 
17 एप्रिल 38.00 
18 एप्रिल 37.00 
19 एप्रिल 37.00 
20 एप्रिल 39.22 

Web Title: marathi news jalgaon tempreture 40 dergy