"टीक-टॉक'च्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू 

"टीक-टॉक'च्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू 

जळगाव : मालवाहू वाहनावरील चालक पांडुरंग मारोती आठरे (वय 26, रा. सुप्रिम कॉलनी) हा घरी आलेल्या मेव्हण्यांच्या भावांसोबत मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना "टीक-टॉक' व्हिडिओ बनविण्याच्या नादात पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकून पांडुरंगचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. बाहेर काढल्यावर श्‍वाच्छोश्‍वास सुरू असल्याने तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. कुटुंबीय मित्रमंडळी त्याला या दवाखान्यातून त्या दवाखान्यात घेऊन वाचवण्यासाठी धावपळ करीत होते मात्र, अपयशी ठरले. मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच त्याच्यावर अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना पोलिसांनी मृतदेह परत जिल्हा रुग्णालयात आणला होता. 

सुप्रिम कॉलनीतील रहिवासी पांडुरंग आठरे याची बहीण अर्चना रक्षाबंधनासाठी माहेरी आली आहे. आज दुपारी पांडुरंगने सुप्रिम कॉलनी परिसरातील त्याचे वाहनचालक तीन ते चार मित्रांसह भंडाऱ्यात जेवण केले आणि नंतर ही मंडळी मेव्हण्यांच्या भावासोबत मेहरुण तलावावर पोहण्यासाठी पोहचले. मेव्हण्याचा भाऊ महादू पट्टीचा पोहणारा असल्याने तो या टोकाहून त्या टोकापर्यंत तलावात पोहत होता. पांडुरंगला मात्र पोहता येत नसल्याने तो काठावरच उड्या मारत होता. पोहताना आपला व्हिडिओ करण्याच्या प्रयत्नात त्याने एकाच्या हातात मोबाईल दिला आणि त्यावर शूटिंग सुरू असतानाच..महादू हे तलावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत निघून गेले होते. अशात पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने पांडुरंग बुडायला लागला. मदतीसाठी आरडाओरड करूनही पोहणारे दूर असल्याने त्यांना येण्यास उशीर झाला. बाहेर काढल्यावर त्याच्या पोटातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. श्‍वाच्छोश्‍वास सुरू असल्याने तातडीने त्याला घेऊन जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याचे त्याचे काका बापू नाना आठरे यांनी सांगितले. 

वाचविण्याची धडपड अन्‌ धावपळ 
जिल्हा रुग्णालयात तपासणीनंतर शंका नको म्हणून गणपती हॉस्पिटल नेण्यात येऊन तेथून ऑर्किड हॉस्पिटलमध्ये हलविले. डॉक्‍टरांनी मृत घोषित केल्यावर घरी नेण्यात आले. निपचित पडलेला असताना पांडुरंगने उलटी केल्याने कुटुंबीयांनी वाचण्याच्या भाबड्या अपेक्षेने पुन्हा भंगाळे हॉस्पिटलमध्ये नेले. दवाखान्याच्या बाहेरच डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर पाडुरंगचा मृत्यू झाल्याचे सांगताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. 

अंतिम संस्काराची तयारी अन्‌ पोलिस पोचले 
डॉक्‍टरांनी मृत झाल्याचे सांगितल्यावर कुटुंबीयांनी मृतदेह थेट घरी नेला होता. कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवाराने शीतपेटी मागवून त्यात ठेवत अंत्यसंस्काराची तयारी चालवली होती. मात्र, दुपारी तलावात तरुण बुडाल्याचे कळाल्यापासून पोलिस शोध घेत होते. माहिती कळताच उपनिरिक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील असे शोध घेतघेत सुप्रिम कॉलनीत धडकले. रात्री आठच्या सुमारास पोलिसांना पांडुरंगचे घर सापडले. पोलिस पथकाने आठरे कुटुंबीयांची समजूत काढून त्यांना जाणीव करून दिल्यावर रात्री साडेआठच्या सुमारास मृतदेह पुन्हा शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. 

कारचे स्वप्न डोळ्यात घेऊन गेला 
पांडुरंगच्या पश्‍चात वडील मारोती, आई कावेरी, मोठा भाऊ किरण, बहीण अर्चना, वहिनी असा परिवार आहे. वडील हातमजुरी करत होते, तर भाऊ चहाची हॉटेल चालवतो. मालवाहू गाडी चालवून पांडुरंग कुटुंबाला हातभार लावत होता. भाऊ किरण व बहीण विवाहित आहे. पांडुरंगचेही लवकरच लग्न करण्याच्या विचारात कुटुंबीय होते. त्याने एका शोरुमध्ये कारचे बुकिंग केले आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ती घरी येणार होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे कार येऊ शकली नाही म्हणून गणेश चतुर्थीचा दिवशी ती कार घरी आणली जाणार होती. चतुर्थी पूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. नवीन वाहनाचे स्वप्न आणि भविष्याचे नियोजन डोळ्यात साठवूनच पांडुरंग निघून गेल्याने कुटुंबीय आक्रोश करत होते. 
 
मिठाचा किस्सा पुन्हा चर्चेत 
शुक्रवारी मेहरुण परिसरातील दोन अल्पवयीन भाऊ तलावात बुडाल्याची घटना घडल्यावर व्हॉटस्‌ऍप मेसेजच्या नादी लागून त्यांना मिठात ठेवण्याचा प्रकार घडला होता. आजही गर्दीतून त्यासाठी उद्युक्त करण्यात येत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com