तोंडापूर धरणाच्या सांडव्याला गळती 

विलास जोशी
गुरुवार, 11 जुलै 2019

वाकोद (ता. जामनेर) : जामनेर तालुक्यातील सर्वात मोठे तोंडापूर धरण खडकी नदीवर आहे. गेल्या पंधरा दिवसापासून चांगला पाऊस होत असल्याने ८० टक्के भरले आहे. मात्र साळव्याला गळती लागली आहे. तिवरे धरणाच्या पार्श्वभूमीवर या धरणाबद्दल ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील यांनी दिला आहे. 

यावेळी माजी जिल्‍हा परिषद सदस्य डिगंबर पाटील, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष गोपाल पाटील, कैलास कोळीसह काही ग्रामस्थांनी या धरण परिसराची चाचपणी केली. यावेळी त्यांना भिंतीला बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले. तसेच यावेळी धरण जवळपास ८० टक्के भरले असून अजून चांगला पाऊस पडल्यास धरण १०० टक्के भरून ओसंडून वाहायला सुरवात होईल. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. हे धरण जवळपास १०७ मीटर असून याचे पाणलोट क्षेत्र ६०.७५ चौरस कि.मी. आहे. याचा विसर्ग १३३२ मिमी प्रति सेकंद इतका आहे. या धरणाची तोंडापूर, ढालगाव, ढालसिंगी, भारुडखेडे, मांडवे, खांडवे या गावांना लाभ होतो. या धरणाचे बांधकामाला १९७५ मध्ये मान्यता मिळाली. १९८९ मध्ये काम पूर्ण झाले. १९९१ मध्ये पाणी साठा होऊन पाटाला पाणी सोडण्यात आले. धरणात साठलेला गाळ न काढल्याने पाहिजे तेवढा पाणीसाठा होत नाही. या धरणावरून अजिंठालेणी सहीत १७ खेड्यांना पाणी पुरवठा होतो. शासनाकडून या धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट करने गरजेचे असून गेल्या तीस वर्षात अजून एकदाही ऑडिट न झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डिगंबर पाटील यांनी दिली. 
 
तोंडापूर धरणाच्या भिंतीला लागलेली गळती ही चिंतेचे बाब असून तिवरे धरणाची पुनरावृत्ती येथे होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. जलसंपदामंत्री तालुक्यातीलच असल्याने त्यांच्याकडून आम्हाला अधिक अपेक्षा आहे. याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. 
- डिगंबर पाटील, माजी जि.प. सदस्य.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tondapur dam water lickeage