कोकणसह गोवा, राजस्थानचे पर्यटन फुल्ल!; हिवाळी पॅकेज टूरवर भर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जळगाव ः हिवाळी मोसमाचा आनंद घेण्यासाठी पॅकेज टूर घेऊन पर्यटक परिवारासह फिरस्तीला जाण्यास पसंती देत आहेत. प्रामुख्याने दक्षिण भारतासह गोवा, राजस्थान, गुजरातमध्ये पर्यटन क्षेत्रासाठीही बुकिंग होत आहे. यामुळे जळगावातून साधारण दोन-तीन ट्रॅव्हल्स्‌ पर्यटकांना घेऊन मार्गस्थ होत आहेत. 

जळगाव ः हिवाळी मोसमाचा आनंद घेण्यासाठी पॅकेज टूर घेऊन पर्यटक परिवारासह फिरस्तीला जाण्यास पसंती देत आहेत. प्रामुख्याने दक्षिण भारतासह गोवा, राजस्थान, गुजरातमध्ये पर्यटन क्षेत्रासाठीही बुकिंग होत आहे. यामुळे जळगावातून साधारण दोन-तीन ट्रॅव्हल्स्‌ पर्यटकांना घेऊन मार्गस्थ होत आहेत. 
हिवाळा म्हटला, की या ऋतूचा आनंद घेण्यासाठी परिवारासह कुठेतरी पर्यटनाला जाण्याचे नियोजन केले जाते. यात आता ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये मुलांच्या वेळापत्रकांचा विचार करून सोयीनुसार पर्यटनाची निवड करत आहेत. बुकिंग करणाऱ्यांत साधारणतः दक्षिण भारत, गुजरात, राजस्थान, गोवा, द्वारका येथील पर्यटनाला पसंती दिली जात आहे. याशिवाय लॉंग टूरमध्ये नेपाळ, दार्जिलिंग, वैष्णोदेवी या ठिकाणी पर्यटनासाठी जळगावकरांकडून बुकिंग केले जात आहे. मात्र, सध्या थंडी वाढल्याने केरळकडील टूरला पर्यटकांकडून टाळले जात आहे. 

टूर कंपन्यांकडून सुविधा 
टूर कंपन्यांकडून पॅकेज घेतले जाते. या पर्यटकांना जवळपास प्राथमिक सुविधा पुरविण्यात येतात. त्यात राहण्याच्या व्यवस्थेसह दोन वेळचे जेवण, चहा, नाश्‍ता, संबंधित ठिकाणच्या पर्यटनाचे महत्त्व सांगण्यासाठी स्थानिक गाइड, येण्या-जाण्याची व्यवस्था आदी सुविधा टूर कंपन्यांकडून पर्यटकांना देण्यात येतात. 

कोकण, अष्टविनायक दर्शन 
बाहेर टूरवर जाण्यासोबत खानदेशातील पर्यटकांकडून कोकण आणि अष्टविनायक दर्शनाला अधिक महत्त्व देत असल्याचे टूरचालकांनी सांगितले. तीन दिवसांचा अष्टविनायक आणि सहा दिवसांचा कोकण टूर दिला जात आहे. याशिवाय कमी कालावधीत अल्पदरात उत्कृष्ट पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही अंशी महाबळेश्‍वरलाही प्राधान्य दिले जात आहे. 

रोज किमान शंभर प्रवाशी रवाना 
जिल्ह्यातून आठ-दहा दिवसांच्या टूर पॅकेजला पसंती दिली जाते. शिवाय जवळच्या तीन-चार दिवसांच्या पॅकेजलाही प्राधान्य दिले जाते. यामुळे जळगावातील टूर्स कंपनीकडे रोजचे बुकिंग सुरू असते. या कंपन्यांकडून साधारण एक-दोन ट्रॅव्हल्स्‌ टूरसाठी वेगवेगळ्या ठिकाणी साधारण शंभर ते दीडशे प्रवासी घेऊन रवाना होतात. 

- काही महत्त्वाचे टूर पॅकेज (एक व्यक्ती) 
- केरळ दर्शन 22 हजार (12 दिवस) 
- गुजरात, राजस्थान 22 हजार (12 दिवस) 
- द्वारका 12 हजार (8 दिवस) 
- कोकण, गोवा 24 हजार (9 दिवस) 
- अष्टविनायक दोन हजार 200 (3 दिवस)
 

हिवाळी पर्यटनासाठी राजस्थान, गोवा याकडे पर्यटक जात आहेत. राज्यातील अष्टविनायक, कोकण येथे पर्यटकांचा कल आहे. मात्र, थंडी वाढल्याने केरळकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 
- ब्रिजमोहन चौधरी, संचालक, चौधरी यात्रा कंपनी. 

Web Title: marathi news jalgaon tour kokan goa traval booking