वृक्षप्रेमींनी ओसाड टेकडीवर फुलविले नंदनवन! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

जळगाव ः ग्लोबल वार्मिंगमुळे सर्वत्र तापमानात वाढ होत आहे. जळगावचे तापमान यंदा 46 अंशांपर्यंत गेले. यामुळे वृक्ष लागवड करून संवर्धन करणे काळाची गरज आहे. पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, शिक्षक, विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन चौरंगीनाथ बाबा टेकडीवर (कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ) शंभर झाडे लावून ती जागविली. आता ओसाड असलेली टेकडी हिरवाईने नटली असून, उन्हाळ्यात ग्रामस्थांना मायेची सावली देत आहे. 

कुऱ्हे पानाचे येथे चौरंगीनाथ बाबा देवस्थानची टेकडी आहे. दोन वर्षांपूर्वी टेकडी ओसाड होती. भुसावळ येथील ग्रीन अर्थ फाउंडेशन, उपज पर्यावरण संस्थेने या टेकडीवर वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प केला. याकामी रा. घो. विद्यालयाच्या मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत इतर विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले. दोन वर्षांपूर्वी करंज, निंब, वड, औदुंबर अशी सावली देणारी झाडे लावली. त्यांचे संगोपन करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना वृक्षांच्या पालकत्वाची जबाबदारी दिली. परिणामी, वर्षभर वृक्षांचे संवर्धन झाले. आता तेथे दाट झाडी निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी गाळलेल्या घामाचे चीज होऊन यंदाच्या उन्हाळ्यात सर्वांना मायेची सावली मिळाली. 
ग्रीन अर्थ फाउंडेशनतर्फे भुसावळ शहरात विविध ठिकाणी आतापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक झाडे लावली आहे. सतत होणारी वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण होते. ग्लोबल वार्मिंगचा दुष्परिणाम रोखण्यासाठी झाडे लावून त्याचे संवर्धन करणे हाच पर्याय असल्याने प्रत्येकाने घराभोवती, मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. 

ग्लोबल वार्मिंगमुळे कार्बन डायऑक्‍साईड वायू बाहेर पडतो. तो वायू झाडे आपल्या लाकुडरूपी कुपीत बंद करतात. यामुळे वातावरण कार्बन डायऑक्‍साईड मुक्त होण्यास मदत होते. यामुळे प्रत्येकाने, संस्थांनी एकत्र येऊन झाडे लावण्याची चळवळ उभी केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल. 
- अभियंता सुरेंद्र चौधरी, सचिव उपज संस्था.

Web Title: marathi news jalgaon tree plantation