जिल्ह्यात तूर, हरभरा विक्रीचे पाच कोटींचे पेमेंट रखडले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

जळगाव ः जिल्ह्यात सुमारे 68 हजार क्विंटल तूर व 90 हजार क्विंटल हरभऱ्याची शासकीय केंद्राने खरेदी केली. यातील सुमारे 25 टक्के तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीचे सुमारे पाच कोटींचे पेमेंट अद्याप अदा केले गेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून, बियाणे, खते, कीटकनाशके कशी घ्यावीत, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शासकीय खरेदी केंद्रात हरभरा, तूर विक्री केलेल्या अनेक उत्पादकांना पैसे मिळालेले नाहीत. मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठ कार्यालयाकडून यासंदर्भात ठोस कार्यवाही होत नसल्याने थकीत पेमेंट मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. सुुमारे दोन कोटी रुपये तूर उत्पादकांचे, हरभरा उत्पादकांचे अडीच कोटी रुपये अप्राप्त आहेत. संबंधित तूर किंवा हरभरा उत्पादक या चुकाऱ्यांसाठी तालुक्‍याच्या ठिकाणी शेतकी संघात जातात; परंतु शेतकी संघाकडून समाधानकारक माहिती दिली जात नाही. 
जिल्ह्यात नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्र होते, तर 12 ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र संबंधित तालुक्‍यातील शेतकी संघांनी सुरू केले होते. तूर खरेदी बंद होऊन अनेक दिवस झाले तरी रक्‍कम नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तुरीची प्रतिक्विंटल 5 हजार 450 रुपये व हरभऱ्याची 4 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी करण्यात आली. 
सध्या खरीप हंगामाचे दिवस आहेत. हाती पैसा हवा आहे. पीककर्जही अनेक जणांना मिळालेले नाही. अशा स्थितीत तातडीने तूर व हरभऱ्याचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 
तूर व हरभरा उत्पादकांना काही टक्के रक्कम दिली आहे. इतर पेमेंट मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्यासंबंधी निधी आणखी मिळेल. 
- परिमळ साळुंखे, व्यवस्थापक, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन 

Web Title: marathi news jalgaon tur 5 carods

टॅग्स