तुरटीपासून पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती 

live photo
live photo

रावेर : द्रवरूप तुरटीपासून पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती घडविण्याचा प्रयोग भुसावळ येथील उद्योजक रामकृष्ण ढाके यांनी यशस्वी केला आहे. या तुरटीच्या गणेशमूर्तीमुळे विसर्जनानंतर पाण्यात प्रदूषण तर होणार नाहीच, पण अन्य गणेश मूर्तींमुळे होणारे प्रदूषण देखील स्वच्छ होणार आहे. शहरात या तुरटीच्या ५० मूर्ती यंदा मोठ्या गणेश मंडळांना मोफत पुरविण्यात येणार असून या प्रकारच्या मूर्तींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

येथील पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या संकल्पनेतील ही तुरटीची मूर्ती घडविण्यासाठी येथील पालिकेचे तुरटी पुरवठादार श्री. ढाके यांनी प्रयत्न केले. श्री. ढाके जळगाव येथील रहिवासी असून भुसावळ येथे त्यांचा डॉल्फिन केमिकल्स हा कारखाना आहे. त्यांना गणपती मूर्ती घडविण्याचा यापूर्वी कोणताही अनुभव नाही. तुरटीचा गणपती ही सोपी बाब नव्हती, द्रवरूप तुरटीचे तापमान खूप जास्त असते, त्यामुळे ते थंड होण्यास व एक मूर्ती तयार होण्यास पाच ते सहा तास लागतात. याउलट प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती त्याचे रसायन साच्यात ओतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात तयार होते. एकदा रबरी साचा घेतला की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असंख्य मूर्ती त्यातून घडविता येतात; पण ह्या द्रवरूप तुरटीच्या तीन-चार मूर्तीच एका साच्यातून घडवता येतात, आणि तो साचा द्रवरूप तुरटीच्या उष्णतेमुळे निरुपयोगी होतो. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही श्री. ढाके यांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याच्या विचारातून हा प्रयत्न यशस्वी केला आहे. एका उत्कृष्ट आणि सुबक गणेश मूर्तीचे सादरीकरण त्यांनी पालिकेत मुख्याधिकारी कक्षात निवडक पत्रकारांसमोर केले. गणेशोत्सवापर्यंत किमान पन्नास मूर्त्या बनवून देऊ असे ते म्हणाले. 

पालिका सहकार्य करणार 
पालिकेचे मुख्याधिकारी श्री. लांडे म्हणाले की, या वर्षी मोठ्या गणेश मंडळांना या मूर्त्या विनामूल्य देणार आहोत. स्थानिक मूर्तिकारांनी अशा प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात रस दाखवला तर पुढीलवर्षी द्रवरूप तुरटी त्यांना पालिकेतर्फे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल. या मूर्तींना रंग देण्यात येणार नाही. रासायनिक रंगांचा वापर केल्याने होणारे प्रदूषण देखील होणार नाही. 

या तुरटीच्या गणेश मूर्तीमुळे मूर्तीचे पावित्र्य तर जपले जाईलच, परंतु पाण्यात विरघळणार असल्याने विसर्जनानंतर मूर्तीची विटंबनाही होणार नाही. अशा मूर्तींचे स्वागत करायला हवे 
- रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, रावेर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com