विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यपाल शिष्यवृत्तीसाठी निवड 

विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यपाल शिष्यवृत्तीसाठी निवड 

जळगाव : राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत विविध गटांत प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यपाल शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. 
जानेवारीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर आणि पदवी- पदव्युत्तर अशा तीन गटांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. या पाचही विद्यार्थ्यांची राज्यपालांकडून शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी दरमहा तीन हजार, तर पीएच. डी. पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी दरमहा सहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, या विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सुरू ठेवणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रगती अहवाल विद्यापीठाला द्यावा लागेल. 
मानव्य विद्या, भाषा व ललितकला गटातील पदवी गटातून मनीषा चौधरी हिने महिलांसाठी संरक्षण बाटली तयार केली आहे. या प्रयोगाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. यात कटर, टॉर्च, जीपीएस करंट बटण, तत्काळ संदेश यंत्रणा, मिरचीचा स्प्रे, पिण्याचे पाणी, अशा काही गोष्टींचा समावेश बाटलीमध्ये आहे. त्यासाठीचे पेटंट फाइल करण्यात आली आहे. पीएच. डी. गटात मानव्य विद्या, भाषा यामधून स्वाती तायडे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. या संशोधनात माध्यमिक स्तरावर विज्ञान अध्यापनासाठी स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य व त्याचा परिणामकारकतेचा अभ्यास या विषयाच्या अनुषंगाने टाकाऊपासून टिकाऊ अशी विज्ञान अध्यापनासाठी प्रतिकृती तयार केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विषयाच्या पीएच. डी. गटात विभा पाटील हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तिने संशोधनात ऍग्रा आउट सोर्सिंग सेंटर' हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी विकसित केला असून, ज्यांना शेती उपकरणे भाडेतत्त्वावर घ्यावे लागतात, अशा शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ऋतूप्रमाणे उपकरणे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात, असे सिद्ध केले आहे. विज्ञान विषयाच्या पदव्युत्तर गटात मोहम्मद शाहरुख एस. एच. शाह याने द्वितीय पारितोषिक प्राप्त केला. त्याने संशोधनात प्रोबायोटिक जिवाणूंपासून कॅल्शिअम फॉस्फेट नॉनोपार्टिकल निर्मिती मानवाच्या शरीरात असलेल्या लाभदायक सूक्ष्म जिवाणूंपासून कॅल्शिअम फॉस्फेट नॉनोपार्टिकल निर्मिती करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात, असे सिद्ध केले आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाच्या पदव्युत्तर गटात शुभम पाटील याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने आपल्या संशोधनात कर्णबधिर व्यक्तींसाठी दातांमार्फत ऐकू येणारे श्रवणयंत्र मोबाईल ऍप व कंपन तयार करणाऱ्या दोन मायक्रोचीप दातांवर बसविल्या आहेत व दातांमार्फत सिग्नल व संवेदना मेंदूला पोचतात. हा प्रयोग 128 जणांवर यशस्वी झाला आहे. या पाचही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर झाल्याबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, कुलसचिव बी. बी. पाटील, विद्यार्थी विकास संचालक प्रा. सत्यजित साळवे "आविष्कार'चे समन्वयक प्रा. भूषण चौधरी यांनी अभिनंदन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com