"उमवि'त यंदापासूनच लागू होणार चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

जळगाव : विद्यार्थी व महाविद्यालये यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून "चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम' लागू करण्याचा निर्णय अधिष्ठाता व सर्व अभ्यासमंडळ अध्यक्षांच्या बैठकीत आज घेण्यात आला. 

जळगाव : विद्यार्थी व महाविद्यालये यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून "चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम' लागू करण्याचा निर्णय अधिष्ठाता व सर्व अभ्यासमंडळ अध्यक्षांच्या बैठकीत आज घेण्यात आला. 
कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक विद्यापीठात झाली. यावेळी "चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम' अर्थात "सीबीसीएस' प्रणालीवर सविस्तर चर्चा झाली. जागतिक पातळीवरील शैक्षणिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी या स्पर्धेत टिकावा, यादृष्टीने जे नवे बदल करता येतील त्या बदलांना सामोरे जाण्याचा सर्व अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांनी या बैठकीत निर्धार व्यक्त केला. कुलगुरू पाटील यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना "सीबीसीएस' प्रणालीचे फायदे विशद केले. 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व नवीन विद्यापीठ कायदा लक्षात घेऊन ही प्रणाली या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाणार आहे. ही प्रणाली लागू करताना येणाऱ्या अडचणींवर मात केली जाईल. या प्रणालीमुळे प्राध्यापकांच्या कार्यभारावर कोणताही परिणाम होणार नाही आणि परिणाम झाल्यास विद्यापीठ हे प्राध्यापकांच्या पाठीशी पूर्णत: उभे राहतील. प्रसंगी शासन दरबारी याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही कुलगुरूंनी बैठकीत दिली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर यांनी या प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती दिली. प्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, अधिष्ठाता प्राचार्य पी. पी. छाजेड, प्राचार्य प्रमोद पवार आणि सर्व अभ्यासमंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. 
 
महाविद्यालयांना सूचना 
"सीबीसीएस' प्रणाली प्रमाणे शैक्षणिक वर्ष 2018-19 चे सर्व अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना या बाबतीतील सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आलेली नसेल, त्या महाविद्यालयांना रूसाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नाही. असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही प्रणाली या वर्षापासून लागू करणे अपरिहार्य आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या रोजगार वाढीसाठीच होणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon univercity choice best credit