मुदतीत निकाल लावण्यात "उमवि' अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लावण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. यासोबतच निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फोटोकॉपी, व्हेरीफिकेशन, रिड्रेसलचे अर्ज करण्यासाठी थेट विद्यापीठात ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात दीड महिन्यात सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आले असून, निकालासह पुनर्मूल्यांकनात देखील "उमवि पॅटर्न' अव्वल ठरले आहे. 

कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी सुरवातीपासूनच सर्व परीक्षांचे निकाल 30 ते 45 दिवसांच्या आत लावले जावेत, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. गतवर्षी सर्व निकाल मुदतीच्या आत जाहीर करण्यात आले. यावर्षी देखील हीच परंपरा कायम राखण्यात विद्यापीठाला यश आले. त्यामुळे यंदा देखील मुदतीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणारा "उमवि पॅटर्न' कायम राहिला आहे. 
 
624 परीक्षांचे निकाल जाहीर 
यंदा विविध विद्याशाखांच्या एकूण 851 परीक्षा घेण्यात आल्या. मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांपैकी 624 परीक्षांचे निकाल तीस दिवसांच्या आत जाहीर झाले. यावर्षी प्रथमच बी.ए, बी.कॉम., बी.एस्सी. या पदवी परीक्षेचे निकाल मे महिन्यातच जाहीर झाले. त्यामुळे पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले. 
 
वेळेसह पैशाची बचत 
यावर्षी सर्व विद्याशाखांच्या परीक्षांकरिता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फोटोकॉपी, व्हेरीफिकेशन, रिड्रेसलचे अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महाविद्यालयाऐवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज सादर केले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत झाली. अर्ज केल्यानंतर आजपर्यंत साडेपाच हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन फोटोकॉपी देण्यात आल्या आहे तर बी.एस्सी.च्या अडीच हजार विद्यार्थ्यांनी रिड्रेसलसाठी ऑनलाइन अर्ज केले आहे. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा निकाल उद्या (19 जून) पर्यंत जाहीर होत असल्यामुळे या विद्यार्थ्यांना एम.एस्सी.च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. 

पाच लाख उत्तरपत्रिका "स्कॅन' 
यंदा विविध विद्याशाखांच्या झालेल्या परीक्षांच्या 5 लाख 25 हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून 19 केंद्रावर या उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रिन मूल्यमापन करण्यात आले. कुलगुरू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. ए. बी. चौधरी यांच्या सहकार्याने तीनही जिल्ह्यात 19 केंद्रांवर हे मूल्यमापन झाले. मूल्यांकनाच्या या कामासाठी सर्व प्राध्यापकांचे विद्यापीठाला चांगले सहकार्य लाभले. 

Web Title: marathi news jalgaon univercity result top